भोपाळ (मध्य प्रदेश) – कोणाचे नशीब कधी पालटेल ते सांगता येत नाही ! असे म्हणतात कि, ‘एखाद्या मानवचे नशीब पालटले, तर त्याला देव किंवा दानव देखील बदलू शकत नाही. इतका त्याच्या जीवनात बदल घडून येऊ शकतो. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका मजुराचे नशीब असे एका रात्रीतच पालटले, कारण त्याला खाणीतून 60 लाख रुपये किमतीचा 13 कॅरेटचा हिरा सापडला. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
हिरे निरीक्षक अनुपम सिंह यांनी सांगितले की, कृष्णा-कल्याणपूर परिसरातील उथळ खाणींमध्ये आदिवासी समाजातील मुलायम सिंह या मजुराला सापडलेल्या हिऱ्याचे वजन 13.54 कॅरेट आहे, ज्याची किंमत किमान 60 लाख रुपये आहे. तसेच मुलायम सिंग यांच्याशिवाय इतर मजुरांकडे वेगवेगळ्या वजनाचे सहा हिरे सापडल्याचेही त्यांनी सांगितले.
या सहापैकी, दोन हिऱ्यांचे वजन अनुक्रमे सहा आणि चार कॅरेट आहे, तर इतरांचे वजन प्रत्येकी 43, 37 आणि 74 सेंट आहे. या सर्व हिऱ्यांची एकूण किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, मात्र त्यांची खरी किंमत लिलावात कळेल. असे देखील या अधिकाऱ्याने सांगितले.
हिरा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुलायम सिंग म्हणाला की, हिऱ्याच्या लिलावातून मिळणारी रक्कम मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. भोपाळपासून 380 किमी अंतरावर असलेल्या पन्ना जिल्ह्यात एकूण 12 लाख कॅरेट हिऱ्यांचा साठा आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तीन मजुरांना देखील असाच एक मौल्यवान हिरा सापडला होता.