इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाणाऱ्या एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाला. दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे दोन अज्ञात तरुणांनी हा हल्ला केला. मात्र यात सर्वजण सुखरूप असून तेथून निघालेला काफिला दिल्लीत पोहचला आहे. तर गोळीबार करणारा एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र ही घटना पूर्व नियोजित कट रचून घडल्याचे ओवेसी म्हणाले.
या घटनेनंतर दुसऱ्या वाहनाने दिल्लीला पोहोचलेल्या ओवेसींनी या घटनेची माहिती दिली. याबाबत ओवेसी यांनी ट्विट करून सांगितले की, पक्षाच्या प्रचारार्थ आम्ही मेरठ आणि किथोरमध्ये रोड शो केला होता. मात्र मी तेथून परतत असताना माझ्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात सुमारे ३ ते ४ अज्ञात तरुणांनी कारवर गोळीबार केला. त्यामुळे माझ्या गाडीने पटकन पेट घेतला. त्यावेळी मी दोन जणांना पाहिले, त्यापैकी एकाने लाल स्वेटर घातले होती तर दुसर्याने पांढरे जाकीट घातले होते. या दुर्घटनेनंतर मी तात्काळ गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या गाडीने पुढे निघालो त्यानंतर याबाबत मी अतिरिक्त एसपीशी बोललो. त्यांनी सांगितले की, एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. माझ्या गाडीवर तीन गोळ्यांच्या खुणा आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी विनंती ही ओवेसींनी केली आहे.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात फॉरेन्सिक टीम तपास करेल. सीसीटीव्हीच्या आधारे एका व्यक्तीची ओळख पटली आहे, आम्ही त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले आहे, त्याची चौकशी सुरू आहे. सर्व पुरावे जमा केले आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले. दरम्यान, नोएडा येथून संशयित आरोपी सचिन याला ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरूनही त्याचा या घटनेतील सहभाग उघड झाला आहे. त्याच्या ताब्यातून एक अवैध पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याचा आणखी एक साथीदार असून तो अद्याप फरार आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.