इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दसरा मेळाव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणावर एमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, देशाला कुठल्याही प्रकारच्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम देशभरात साजरे होत असताना काही राजकीय मेळावे देखील घेण्याची परंपरा आहे. ज्याप्रमाणे मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो, त्याचप्रमाणे नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचा विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांचा मेळावा पार पडतो, या मेळाव्यात आरएसएसचे सरसंघचालक मार्गदर्शन करतात. नागपूरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतातील लोकसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त केली, मात्र त्यांच्या या लोकसंख्या वाढी संदर्भातील वक्ताव्यावर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कठोर टीका केली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा हिंदू – मुस्लिम असे वादांग उठते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशात लोकसंख्येच्या बाबतीत एक व्यापक धोरण लागू करायला हवे, तसेच लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कठोर कायदा आणायला हवा. तर दुसरीकडे भागवत यांच्या या विधानांबाबत बोलताना एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोहन भागवतांचे नागपूरातील विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. असे सांगत ओवेसी म्हणाले की, खरे म्हणजे तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही.
मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले होते की, देशात जेवढी अधिक लोकसंख्या असेल तेवढा जास्त बोजा वाढेल. आपला देश किती लोकांना अन्न आणि आधार देऊ शकतो याविषयी देखील विचार करायला हवा. यातून कोणालाच सूट मिळू नये. आपली लोकसंख्या वाढतेय असे चीनच्या लक्षात आले, त्यावेळी त्यांनी लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी पावले उचलली. आपल्या समाजालाही जागरुक व्हायला हवे, तसेच नोकरीत एकटे सरकार आणि प्रशासन किती रोजगार वाढवणार? समाजाने दुर्लक्ष केल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते, असेही भागवत म्हणाले.
भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावरील वक्तव्यावरून ओवेसी यांनी कडक टीका केली आहे, असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, एकीकडे मोहन भागवत हे हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल बोलतात ते दोघे एकाच असल्याचे सांगतात आणि जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे.
विशेष म्हणजे सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच हिंदू मुस्लिम यांच्यात एकतेची भावना निर्माण व्हावी, देशात शांततापूर्ण वातावरण असावे, यासाठी मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत बंद दाराआड तासभर झालेल्या या बैठकीनंतर इल्यासी यांनी हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, असे म्हटले केले होते, भागवत हे राष्ट्रपिता आहेत, असेही ते म्हणाले होते.
आता, या घटनेला दोन आठवड्यांचा देखील कालावधी उलटत नाही तोच पुन्हा एकदा मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत वक्तव्य केल्याने दुसरीकडे मुस्लिम समाजाचे कट्टर राजकीय नेते मानले जाणारे ओविसी यांनी त्यांच्यावर या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत टीका टिप्पणी सुरू केली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. नागरिकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.
MIM MP Asududdin Owaisi on Mohan Bhagwat Speech