नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या कृतीदलामध्ये नाशिकच्या महेंद्र छोरिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ संपूर्ण देशात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने 17 नोव्हेंबर रोजी सुकाणू समिती व कृतीदल गठीत केले आहे. या कृती दलामध्ये नाशिक शहरातील ज्येष्ठ उद्योजक व भगर उत्पादक श्री महेंद्र छोरीया यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे व लोकांच्या आहारात तृणधान्याचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने कृषी व इतर संलग्न विभागांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करणे यासाठी हे कृती दल काम करणार आहे.
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्यावतीने देखील ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ हे वर्ष देश पातळीवर साजरे करण्यासाठी समिती गठीत केली आहे, त्या समितीत देखील महेंद्र छोरिया यांची निवड करण्यात आली आहे. महेंद्र छोरीया हे भगर उत्पादक असून गेल्या अनेक वर्षांपासून भगर उत्पादनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नाशिक भगर मिल असोसिएशनच्या माध्यमातून भगरीचे उत्पादन व विक्री यांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम छोरिया यांनी केले असून आदिवासी बांधवांच्या मालाला योग्य तो भाव मिळावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी छोरीया हे सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील भगर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण असून खऱ्या कार्यकर्त्याला राज्य सरकारने न्याय दिला अशी भावना भगर उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे या माध्यमातून संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून तृणधान्याचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे
– महेंद्र छोरीया, भगर उत्पादक
Millets Year 2023 Task Force Mahendra Chhoria Selection