पुणे – आरोग्याच्या बाबतीत आजकाल लोक जरा जास्तच जागरूक झाले आहेत. काय आणि किती प्रमाणात खावे, यासाठीचे सगळ्यांचे आडाखे ठरलेले असतात. एखाद्याला त्याची माहिती नसेल तर यासंबंधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले जाते. पण, हे सगळे झाले तरी यात सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते, ती म्हणजे, खाण्यापिण्यातील नियमितता आणि वेळेचे बंधन. प्रत्येक पदार्थ खाण्याची एक वेळ असते, यामुळे ती वेळ पाळली गेली तरच आपण जे खातो, त्याचा आपल्याला फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ खाण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.
भात
दुपारच्या जेवणाची वेळ ही भात खाण्यासाठी सर्वाेत्तम वेळ असल्याचे संशोधक सांगतात. दिवसा पचन चांगले होते. तसेच दुपारी आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. भातातील कर्बोदके आपल्या शरीराला लाभदायक ठरतात. यामुळे भात दुपारीच खावा. मात्र, भात शक्यतो रात्री खाऊ नये. कारण यामुळे वजन वाढू शकते. याची काळजी घ्यायला हवी.
दूध
दूध रात्री पिणे आपल्यासाठी फायदेशीर असते. कारण, यामुळे दिवसभर थकलेल्या शरीराला आणि मनाला शांतता मिळते, शिवाय झोपही चांगली लागते. दूध तसे पचायला जड असल्याने दिवसा पिऊ नये. कारण, यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते. मुलांना मात्र, सकाळी दूध द्यायला काहीच हरकत नसते. कारण त्यांची सतत हालचाल सुरू असते, आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त एनर्जीची गरज असते. त्यामुळे सकाळी दूध दिल्याचा त्यांच्या पचनसंस्थेवर काहीच विपरीत परिणाम होत नाही.
दही
आयुर्वेदाच्या मते दही सकाळच्या वेळी खावे. नाश्त्याच्या वेळी देखील तुम्ही खाऊ शकता. दही आपल्या पचनसंस्थेला तंदुरुस्त ठेवते. पण, काही जण रात्री देखील दह्यातील कोशिंबीर वगैरे खातात. हे त्रासदायक ठरू शकते. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो रात्री दही खाणे टाळावे.
सफरचंद
सफरचंद सकाळी खावे. कारण त्याच्या सालातून मिळणारे फायबर शरीराला फायदेशीर असते. काहीजणांना उशीरापर्यंत काम करावे लागत असल्याने खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वेळा अनियमित असतात. त्यामुळे त्यांना पचनासंबंधी अनेक समस्या असतात. यावर सकाळी सफरचंद खाणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. पण संध्याकाळी किंवा रात्री कधीही हे फळ खाऊ नये. कारण यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. सफरचंदात असलेल्या पेक्टिन या घटकद्रव्यामुळे हा त्रास होतो.
केळी
केळी हे सहज उपलब्ध होणारं आणि सर्वांना आवडणारं असं फळ आहे. त्यातील पोटॅशिअम आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते. त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. तरीही रात्री केळे खाणे टाळावे. यामुळे अपचन होऊ शकते.
साखर
साखरेमुळे होणारे आजार पाहता, अलीकडे डॉक्टरही साखर खाण्याला फार पसंती देताना दिसत नाहीत. त्याऐवजी गूळ, मध असे पर्याय वापरण्याचा सल्ला देतात. पण साखर खायचीच असेल तर ती दुपारी खावी, कारण त्यातून ऊर्जा मिळते. आणि दुपारी तिचे पचनही चांगले होते. पण रात्री साखर खाणे टाळावे, कारण यामुळे लठ्ठपणा तसेच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
हे सगळे नियम पाळले तर तुमची तब्येत निश्चितच चांगली राहील. तरीही प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार यात बदल होऊ शकतो.