नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी तपासणी पथकांमार्फत धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिली आहे.
सर्व दुध विक्रेते, स्वीटमार्ट धारक, किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतांना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे, असेही श्री. नागरे यांनी सांगितले आहे.
पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त विवेक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, वैद्यमापन शास्त्रचे उपनियंत्रक अ. भि. गिरनारे आदी उपस्थित होते.