खार्तूम – म्यानमारमध्ये लोकशाही धोक्यात आल्यानंतर आता सुदानमध्येसुद्धा लोकशाहीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. लष्कराने सुदानमधील अंतरिम सरकार उलथवून देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. लष्कराने देशात आणीबाणीची घोषणा केली असून पंतप्रधानांसह अनेक नेत्यांना अटक केली आहे. लष्कराच्या या कारवाईविरोधात राजधानी खार्तूममध्ये नागरिकांचा जबरदस्त आक्रोश आहे. खार्तूममध्ये निमलष्करी दलांना तैनात करण्यात आले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. नागरिकांचे आवाज दाबले जात आहेत.
खार्तूममध्ये नागरिक रस्त्यावर
लष्करी कारवाईविरोधात राजधानी खार्तूममध्ये मोठा आक्रोश दिसून आला आहे. लष्कराविरुद्ध रस्त्यावर निदर्शने सुरू झाली आहेत. लष्कराने नागरिकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. परंतु यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. निदर्शने करणार्या नागरिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलक लष्कराच्या मुख्यालयाजवळ जाताना दिसत आहेत. नेत्यांच्या अटकेविरोधात आंदोलकांनी राजधानीचे अनेक मार्ग बंद केले आहेत. लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्ही प्राणाचे बलिदान देण्यास तयार आहोत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
माहिती प्रसारण मंत्रालयाकडून पुष्टी
सुदानच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने अटक केलेल्या नेत्यांची सुटका करण्यासह सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नांना रोखण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लष्कराने देशातील सरकारी टीव्ही आणि रेडिओ मुख्यालयेसुद्धा आपल्या ताब्यात घेतली आहेत. मंत्रालयाने याबाबतची माहिती आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. देशात लष्काराने सत्तापालट केली आहे. लष्कराचा हा हस्तक्षेप नागरिकांनी रोखवा, असे आवाहनही माहिती प्रसारण मंत्रालयाने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना केले.
जनरल बुरहान यांचा नागरिकांना संदेश
सुदानच्या अंतरिम सरकार चालविणार्या परिषदेचे प्रमुख जनरल अब्देल फतह अल बुरहान यांनी सत्तापालट झाल्यानंतर देशाला संबोधित केले. सुदानमध्ये राजकीय संघर्षच लष्कराच्या हस्तक्षेपाला जबाबदार असल्याचा दावा बुरहान यांनी केला आहे. नागरिकांचे प्रतिनिधी आणि लष्करामध्ये सत्तेची भागिदारी असलेल्या कराराला तोडण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांनी मंत्रिमंडळही बर्खास्त केले आहे.
सरकार आणि लष्करात संघर्ष
सुदानमध्ये दोन वर्षांपूर्वी उमर अल बशीर यांना सत्तेवरून हटविल्यानंतर एक अंतरिम सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हापासून लष्कर आणि सरकार यांच्यात तिढा वाढला होता. सुदान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुदानला बरीच मदत मिळत आहे. परंतु सत्तापालट झाल्यानंतर ती मदत थांबविली जाऊ शकते. असे झाले तर सुदानमध्ये आर्थिक आणिबाणीसुद्धा लागू शकते.