रंगुन – म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर रक्तरंजीत संघर्ष सुरू आहे. म्यानमारचे लष्कराचे नेते जनरल मिन आंग हलिंग यांनी स्वतःला पंतप्रधान म्हणून घोषित केले आहे. म्यानमारमध्ये २०२३ पर्यंत निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आखला जात आहे, असे जनरल मिन आंग हलिंग यांनी टीव्हीवर दिलेल्या एका संदेशात म्हटले आहे.
या राजकीय संकटातून तोडगा काढण्यासाठी अग्नेय आशिया देशांसोबत सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र आणि निष्पक्ष बहुपक्षीय निवडणूक घेण्यासाठी पोषक वातावरण बनविले पाहिजे. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली पाहिजे. या काळात बहुपक्षीय निवडणूक घेण्याचे मी आश्वासन देतो, असे हलिंग यांनी स्पष्ट केले आहे.
लोकतांत्रितरित्या निवडलेल्या सरकारला लष्कराने फेब्रुवारीमध्ये उलथवून टाकल्यानंतर मिन आंग हलिंग यांनी ही घोषणा केली आहे. संपूर्ण देशात लष्करी राजवटीविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. निवडणुकीत फसवणूक झाल्याचा दावा करत लष्कराने सत्ता काबीज केली आहे. म्यानमारच्या अपक्ष नेत्या आंग सान सू यांच्या पक्षाने निवडणूक जिंकली होती. त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अनधिकृतरित्या वॉकीटॉकी बाळगल्याबद्दल तसेच कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविल्याच्या आरोपांसह अनेक गुन्ह्यांचे त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत.