नाशिक – अखिल भारतीय पातळीवर झालेल्या परिक्षेत प्राविण्य यादीत स्थान मिळवत मिहीर मोहन देशपांडे यांची भारतीय नौदलात अधिकारी श्रेणीमध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारीच तशा सूचना ईमेल द्वारे भारतीय नौदलाच्या दिल्ली येथील मुख्यालयातून मिहीरला प्राप्त झाल्या आहे. या मेलमध्ये त्याला पुढील प्रशिक्षणासाठी इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमाला, कुन्नूर, केरळ येथे १२ जुलै २०२१ पासून रुजू व्हायला सांगितले आहे.
बौद्धिक, मानसिक, शारीरिक व वैद्यकीय अशा अत्यंत कठोर निकषांवर आधारित विविध टप्प्यांवरील पुणे व बेंगलोर येथे झालेल्या चाचण्या पार करत अखिल भारतीय पातळीवरील प्राविण्य मिळविलेल्या पहिल्या २७ उमेदवारांच्या निवड सूचीमध्ये मिहीर याने स्थान मिळविले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही क्लासेस – कोचिंग शिवाय त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर हे यश मिळवले आहे. देशपातळीवर अपवादाने मिळणारे यश असल्याने त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
मिहीर देशपांडे हे रंगुबाई जुन्नरे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथून फर्स्ट क्लास व विशेष प्राविण्यासह मेकॅनिकल इंजिनिअर पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते एम एस एल ड्राईव्हलाईन सिस्टीम लिमिटेड सातपूर नाशिक येथे पर्चेस इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.