मुंबई – तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६ ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.