विशेष प्रतिनिधी, मुंबई
कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टन अखेर सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘विंडोज ११‘ लॉन्च केले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये कंपनीने विंडोज १० लॉन्च केले होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत नवे संगणक व इतर उपकरणांमध्ये विंडोज ११ उपलब्ध झालेले असेल. शिवाय विंडोज १० चा वापर करणाऱ्यांना विंडोज ११ चे अपडेट निःशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विंडोज आपरेटिंग सिस्टीमची पहिली एडिशन १९८५ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात बरेच बदल झाले. बरीच क्रांती झाली. त्यात विंडोज १० पर्यंतचा प्रवास झाला. आता मायक्रोसॉफ्टने नवे स्टार्ट मेन्यू आणि इतर सुविधा असलेले विंडोज ११ सादर केले. त्यात आणखी एका वैशिष्ट्याची घोषणा कंपनीने केली. ती ऐकून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
विंडोज ११ चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य हे आहे की याचा अँड्रॉईड ओएसवर चालणाऱ्या अॅप्सलाही सपोर्ट करेल. त्यासाठी विंडोज ११ मध्ये अमेझॉन अॅपस्टोअरच्या माध्यमातून एक नवे विंडोज स्टोअर जोडण्यात आले आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने इंटेलसोबत त्याच्या इंटेल ब्रिज तंत्राचा वापर करण्यासाठीही करार केला आहे. मायक्रोसॉफ्टने इंटेलच्या संदर्भात केलेला करार हा प्रतिस्पर्धी अॅप्पलला दिलेली टक्कर समजली जात आहे. मायक्रोसॉफ्टने अँड्रॉईड अॅप्सला विंडोजमध्ये रन करण्याची योजना २०१५ मध्येच आणली होती. मात्र एकाच वर्षात ती अपयशी ठरली होती.
काय असेल विंडोज ११ मध्ये
विंडोज ११ मध्ये अॅप्सचे नवे आयकॉन, अॅनिमेशन, नवा स्टार्ट मेन्यू, टास्कबार लेआऊट बघायला मिळणार आहे. याशिवाय विंडोजसोबत कंपनी एपलाही रि–अरेंज करू शकते. त्याचा फायदा मल्टीपल मॉनिटरमध्ये मिळेल. ब्ल्यूटुथ आडियो अधिक सुलभ झालेले असेल.