शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

MDH मसाल्याचा उद्योग कसा सुरू झाला माहिती आहे का? वाचून तुम्ही थक्कच व्हाल

by India Darpan
ऑगस्ट 2, 2022 | 9:40 pm
in इतर
0
MDH Masale

 

एमडीएच मसाले

“मरावे परी किर्तीरूपी उरावे” या उक्तीला अगदी सार्थपणे खरे करणाऱ्या पद्मविभूषण महाशय धरमपालजी गुलाटी यांचा यशोप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला व्यवसाय मोठा करतांना उत्तम गुणवत्ता, माफक दर व झोकून देण्याची तयारी याच त्रिसूत्रीवर काम केले व दरवर्षी आपल्या उत्पन्नापैकी ९०% रक्कम समाजासाठी दान दिले. जाणून घेऊया या खऱ्या अर्थाने असलेल्या महाशयांबद्दल….

Dr. Prasad Photo
प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
मो. 9921212643

१९१९ साली सियालकोट म्हणजेच आजच्या पाकिस्तानातील पूर्वोत्तर पंजाब मधील एक भाग. येथे श्री चुनीलालजी गुलाटी यांनी आपल्या सात-आठ मुलांचा मोठा संसार सांभाळण्यासाठी ‘महाशया दी हट्टी’ हे दुकान सुरू केलं होतं. म्हणजेच महाशयांचे दुकान. अतिशय कमी कालावधीमध्ये हे दुकान फारच लोकप्रिय झालं. या दुकानात सर्व प्रकारचे मसाले परवडतील अशा किंमतीमध्ये मिळत होते. याच शेठ चुन्नीलाल यांचे धाकटे चिरंजीव श्री धर्मपालजी गुलाटी यांचा २७ मार्च १९२३ साली जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात फार रुची नव्हती.

इयत्ता पाचवी पास होईपर्यंत त्यांनी वडिलांना अगदी निडरपणे सांगितलं होतं की माझ्याकडून फार अभ्यास होत नाही व तो मला आवडत देखील नाही. यावर त्यांच्या वडिलांनी न चिडता न रागवता धरमपाल यांना अनेक पर्याय खुले करून दिलेत. तुला जर अभ्यासात रुची नसेल तर तू काहीतरी नवीन कला अवगत कर. ज्याच्या जोरावरती तू तुझा उदरनिर्वाह करू शकशील. आणि म्हणून धरमपाल यांना सुरुवातीला सुतार काम शिकण्यास पाठवलं. थोडे महिने त्यांनी हे काम देखील शिकले पण हवा तसा रस त्या कामात निर्माण होत नव्हता. म्हणून त्यांनी व त्यांच्या वडिलांनी दुसरा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. साबण बनवण्याचे कौशल्य अवगत करण्यासाठी धरमपालजी यांनी पुन्हा प्रयत्न केले. कला जरी अवगत झाली तरी त्यासोबत गरजेचा असलेला इंटरेस्ट निर्माण होत नव्हता. या व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते म्हणून पुन्हा त्यांनी आपला मार्ग बदलला.

सुतारकाम व साबण यांच्या पाठोपाठ त्यांनी कपड्याचा व्यापार करणे, हार्डवेअरचे साहित्य ट्रेडिंग करणे, तांदळाचा व्यापार करणे असे अनेक पर्याय आजमावून पाहिले. पण कुठल्याच एका क्षेत्रामध्ये त्यांना अपेक्षित यश येत नव्हतं किंवा मन लागत नव्हतं. अखेर त्यांच्या वडिलांनी धरमपाल यांना आपल्याच मसाल्याच्या व्यापारात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही बाप-बेटे आपला मसाले तयार करण्याचा व विकण्याचा व्यवसाय करू लागले. अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्या व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजेच उत्तम गुणवत्ता, परवडणाऱ्या किंमती व त्यासोबतच झोकून देण्याची प्रवृत्ती. आणि त्यांच्या याच प्रवृत्तीमुळे हा मसाल्यांचा व्यवसाय अतिशय कमी कालावधी मध्ये लोकप्रिय झाला होता. त्यांना आता परिसरातील बऱ्याच गावांमध्ये ‘देगी मिरची वाले’ असे म्हणून ओळखू लागले होते. दोघं बाप, बेटे यांनी मिळून हा व्यवसाय एका चांगल्या उंचीपर्यंत नेऊन ठेवला. याच दुकानाच्या  जोरावर १९४१ साली त्यांचा विवाह देखील संपन्न झाला.

आपला व्यवसाय सांभाळत असताना देखील  धरमपालजी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रीय पद्धतीने सहभागी होते. आणि अखेर तो दिवस उजाडला १५ ऑगस्ट १९४७ भारताला  परकीय सत्तेतून  स्वातंत्र्य मिळालं.  धरमपालजींसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांना यश मिळाले. पण हा स्वातंत्र्याचा आनंद सोबतच फाळणीचे दुःख देखील घेऊन आला. फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिल्यावर आपले काय हाल होऊ शकतात याचा अंदाज आधीच घेऊन श्री धरमपाल यांचे सर्व कुटुंबीय यांनी आपलं सर्वकाही सोडून भारतात येण्याचा निर्णय केला. बोलायला जरी सोपे वाटत असले तरी त्या काळात प्रचंड विरोध सुरू असताना आपल्या परिवाराला सुखरूप दुसऱ्या देशात घेऊन जाणं म्हणजेच अतिशय जिकरीचे काम होते. धरमपालजी स्वतःच म्हणतात “आम्ही फार नशीबवान होतो म्हणून सुखरूप संपूर्ण कुटुंबासह भारतात पोहोचू शकलो. नाहीतर आमच्या डोळ्यांसमोर अनेक हिंदू परिवारांची कत्तल झालेली आम्ही पाहिली आहे.”

सप्टेंबर १९४७ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी अमृतसर येथील रेफ्युजी कॅम्प मध्ये आश्रय घेतला. काही काळ तिथे राहिल्यानंतर धरमपालजी आपल्या पत्नीच्या भावासोबत दिल्लीकडे आले. आपल्या एका नातेवाईकाची अतिशय वाईट स्थितीत असलेली एक लहानशी अडगळीची खोली त्यांना राहायला मिळाली. दिल्लीत येताना त्यांच्या वडिलांनी होते नव्हते ते सर्व पैसे धरमपालजी यांना दिले. ती रक्कम एकूण १५०० रुपये होती. त्या पंधराशे रुपयांपैकी ६५० रुपये खर्च करून त्यांनी एक टांगा विकत घेतला. उर्वरित पैसे आपल्या खर्चासाठी ठेवले. मोठ्या माणसांची हीच खासियत असते. ते असलेल्या भांडवलातून नवीन अॅसेट निर्माण करतात. ज्यातून त्यांना उत्पन्न सुरू होईल. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुब रोड व करोलबाग या मार्गावर त्यांनी आपला टांगा चालवण्यास सुरुवात केली. एका सवारीचे आठ आणे म्हणजेच रुपयाचा आठवा भाग इतकच उत्पन्न त्यांना मिळत होतं. हे त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता जरी पुरेसं असलं तरी आपला संपूर्ण परिवार पोसण्यासाठी हे फारच तुटपुंजे होतं.

टांगा चालवून येणाऱ्या उत्पन्नात आपले भागत नाही हे लक्षात येताच त्यांनी टांगा विकला. आता पुन्हा दुसरा व्यवसाय शोधायची त्यांच्या वर वेळ आली. खूप विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या व्यवसायात आपण स्वतःला सिद्ध केला आहे, तोच व्यवसाय का पुन्हा सुरू करू नये. म्हणून त्यांनी करोल बाग येथील अजमल रोड वर एक १४ X ९ फूटचे दुकान भाड्याने घेतले. आणि याठिकाणी त्यांनी पुन्हा आपल्या पुरातन मसाले कुटण्याचा, तयार करण्याचा व विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता पुन्हा दुकानावर तीच पाटी लागली होती “महाशयां दी हट्टी” सियालकोटचे “देगी मिर्च वाले”.

या व्यवसायात त्यांच्या संपूर्ण परिवाराने झोकून दिलं. आपल्या आई-वडिलांच्या या व्यवसायात असलेला प्रदीर्घ अनुभव, आपली पत्नी व भावंडं यांची मिळालेली साथ व स्वतःची बुद्धिमत्ता आणि धाडस करण्याची प्रवृत्ती. या जोरावर त्यांचा हा व्यवसाय गती घेऊ लागला. दिल्ली शहरात त्यांचे चांगले नाव झाले आणि उत्पन्नही चांगले येऊ लागले. पण इथे थांबून चालणार नाही. आपल्याला हा व्यवसाय मोठा करायचा आहे. या जिद्दीने त्यांनी पुढील पाऊले उचलण्यास सुरुवात केली. १९५३ मध्ये त्यांनी दिल्लीच्या चांदणी चौक या भागात आणखी एक दुकान भाडेतत्त्वावर घेतले व तिथेही आपला हाच व्यवसाय थाटला. परिवार मोठा असल्याचा त्यांना फायदाच होत होता. सर्वांची एकमेकांना साथ होती. सगळे एकमेकांना धरून होते. आणि म्हणूनच व्यवसायात देखील प्रगतीच दिसत होती.

मसाले तयार करण्यासाठी आता त्यांना दोन्ही दुकान व घरची जागा देखील अपुरी होत होती. या दोन्ही दुकानांमधील उत्पन्न उत्तम येत आहे. आता आपल्याला विस्तार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन धरमपालजी यांनी किर्ती नगर परिसरात एक प्लॉट विकत घेतला. या प्लॉटवर त्यांनी आपली मसाले तयार करण्याची फॅक्टरी उभी केली. आणि फॅक्टरी ला नाव देण्यात आलं “महाशयां दी हट्टी” लिमिटेड म्हणजेच आजचे एमडीएच (MDH).

फॅक्टरी सुरू केल्याने आता त्यांना गरजेपेक्षा जास्त माल तयार करता येऊ लागला. संपूर्ण दिल्ली व परिसरातील मागणी पुरवून देखील त्यांच्याकडे अधिक माल शिल्लक होता. त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. दिल्ली बाहेरील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपला माल पाठवला. त्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला तो पूर्व बिहार मधील सिंगभूम व ओडिसातील मयूरभंज या जिल्ह्यांमधून.

आता त्यांनी आपली उत्पादने वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. तुमचे उत्पादन कितीही उत्तम प्रतीची असले पण जर ते तुमच्या ग्राहकालाच माहित नसेल तर त्याची विक्री होणे फार अवघड होतं. हाच अनुभव धरमपालजी यांना येऊ लागला. दिल्लीमध्ये त्यांचे प्रत्यक्ष दुकान असल्याने त्यांना लोकं समोर पाहत होते, ओळखत होते व त्यामुळे त्यांचा माल सहजरित्या विकला जात होता. इतर राज्यांमध्ये यांचं नाव देखील कोणी ऐकलं नव्हतं. तेव्हा आपले उत्पादन नवीन क्षेत्रात विकण्यासाठी जाहिरात किती महत्त्वाची आहे, हे त्यांना यातून लक्षात आलं. आणि म्हणूनच आता एमडीएच या कंपनीने वर्तमानपत्रांमध्ये आपली जाहिरात देण्यास सुरुवात केली. पण जाहिरातीसाठी कुणीतरी ब्रँड अँबेसिडर असावा, असं अनेकांनी सूचवलं.

कोणी सेलिब्रिटी किंवा नामवंत व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतो त्या वेळेला त्या उत्पादनाची विश्वासार्हता वाढते, असा एक प्रघात आहे. तेव्हा यावर धरमपालजी म्हणतात “तिसऱ्या व्यक्तीकडे बघून माझ्या उत्पादनावर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्याकडे बघूनच माझे उत्पादन खरे आहे हे समजून घ्यावं” आणि म्हणूनच एमडीएचच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये धरमपालजी स्वतःच  दिसतात. आणि हीच पद्धत त्यांनी वृत्तपत्रातल्या जाहिरातींमध्ये व पुढे टीव्हीवरील जाहिरातींमध्ये देखील सुरू ठेवली. होय, आपण जे अनेक वर्ष लाल फेटा बांधलेले दिमाखदार व्यक्तिमत्व एमडीएचच्या जाहिरातींमध्ये पाहतोय, तेच हे महाशय श्री धर्मपालजी गुलाटी.

या जाहिरातींच्या जोरावर एमडीएच हा ब्रँड भारतभरातील घराघरांमध्ये पोहोचवला. एमडीएच मसाले हे केवळ भारतातच प्रसिद्ध नसून अमेरिका, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांमध्ये देखील त्याची मागणी आहे. त्याचे उत्पादन कारखाने दुबाई आणि अन्य देशातही आहेत. आज आपल्या ६२ उत्पादने व त्यांचे १५० हून अधिक पॅकिंग यांचा जगभरात विस्तार झाला आहे. आज भारतात दुसऱ्या क्रमांकावर मसाल्यांची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील सतत वाढ होत आहे. २०१५-१६ मध्ये त्यांचे उत्पन्न ९०० कोटी रुपये होतं. तेच २०१९-२० साली एमडीएचचा टर्नओव्हर हा २००० कोटीहून अधिकचा आहे. व याच वर्षाकरता त्यांनी ४०० कोटी रुपयांहून अधिकचा निव्वळ नफा नोंदवला आहे. इवल्याशा रोपाचा आजचा झालेला वटवृक्ष सांभाळणारी ही एकच व्यक्ती आहे. या कंपनीचे ८० टक्के मालकी हक्क धरमपालजी यांच्याकडे होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत धरमपालजी स्वतःच या कंपनीचे सीईओ होते.

धरमपालजी यांचे सीईओ म्हणून वार्षिक वेतन हे २१ कोटी रुपये होते. आणि विशेष म्हणजे भारतातील या क्षेत्रात काम करणाऱ्या गोदरेज, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर या सर्व कंपन्यांच्या सीईओच्या तुलनेमध्ये हे वेतन सर्वात जास्त होते. पण खरे देशभक्त व आर्य समाजाचे अनुयायी असल्याकारणाने आपण या देशाचे, धर्माचे व समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने ते आपल्या उत्पन्नातील ९०% भाग दान करत असत. महाशय चुनीलाल ट्रस्ट या नावाने त्यांनी एक समाजसेवी संस्था स्थापन केली असून याअंतर्गत अनेक मोठमोठे हॉस्पिटल्स उभे करण्यात आले आहेत.

ज्यात गोरगरिबांचे उपचार मोफत केले जातात. यासोबतच त्यांचे काही मोबाइल दवाखाने आहेत जे खेडोपाडी व मागासलेल्या वस्तीमध्ये जाऊन मोफत उपचार करत असतात.  यासोबतच त्यांनी २० हून अधिक शाळा उभ्या केल्या आहेत. ज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मोफत दिले जाते. या सर्व कार्यासाठी धरमपालजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण हा उच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या अखेरच्या काळात देखील देशभक्तीपर गीत गाणारे व देशाच्या हितासाठी सतत विचार करणारे खऱ्या अर्थाने महाशय असलेले धरमपालजी यांनी ३ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. एका तळपत्या तेजाचा, एका महापर्वाचा अंत झाला. आपल्या व्यवसायाची धुरा आपल्या नातवंडांच्या हाती सोपवून हजारो कुटुंबांचा पोशिंदा अनंतात विलीन झाला.

MHD Masale Industry Success Story by Dr Prasad Joshi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टप्पूने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडली? चर्चांना उधाण

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नाच्या रात्रीच पती पत्नीला मारतो तेव्हा

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - लग्नाच्या रात्रीच पती पत्नीला मारतो तेव्हा

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011