नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथावर आणि करिअप्पा परेड ग्राऊंडवर महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) ८ आणि गोव्यातील 2 असे एकूण १० विद्यार्थी-विद्यार्थीनी कसून सराव करीत आहेत. यावर्षी ७३व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण १५० एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थीनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून ४ विद्यार्थी आणि ४ विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण १० विद्यार्थी- विद्यार्थीनी या शिबीरात सराव करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एनएसएस सराव शिबिरात महाराष्ट्रातील ८ विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातून १४ विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभागी होतात, तसेच देशभरातून २०० ऐवजी १५० विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग आहे. हे शिबीर 31 जानेवारी 202२ पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभातफेरी,योगासने,बौध्दिकसत्र,सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो अशी माहिती महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पवन नाईक यांनी दिली. 1 ते १५ जानेवारी पर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव चालला,तर १६ जानेवारीपासून सकाळी राजपथावर आणि सायंकाळी करिअप्पा परेड ग्राऊंडवर पथसंचलन सराव सुरु असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले.
या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो १८ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्रदिन’ साजरा झाला.महाराष्ट्राच्या चमुने तयार केलेले खास डिजीटल निमंत्रणपत्र,राज्याची संस्कृती दर्शविणारा व राष्ट्रीय एकात्मतेसह विविध सामाजिक संदेशांच्या वैशिष्टयांनी नटलेला बहारदार कार्यक्रम सादर झाला.
या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश
महाराष्ट्राच्या चमूत नाशिक जिल्हयाच्या इगतपुरी येथील एस.एम.बीटी आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रिन्स पिल्ले,पुणे येथील गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचा राज खवले,वांद्रे(पश्चिम) मुंबई येथील आर.डी.अँड एस.एच.नॅशनल कॉलेज अँड एस.डब्ल्यु.ए. सायंस कॉलेजचा प्रकाश सेल्वा आणि संगमनेर येथील एस.एन.आर्ट्स, डि .जे. एम. कॉमर्स अँड बी.एन.सारडा सायंस कॉलेजचा थिटम पोपट या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर नाशिकच्या मोतिवाला होमियोपॅथी मेडिकल कॉलेजची साना शेख, अहमदनगर येथील बिपीएचई सोसायटीच्या कॉलेजच्या फिरदोस हसन, पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील अवसारी-खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची ऋतुजा शिर्के आणि मुंबई, चर्चगेट येथील के.सी.महाविद्यालयाची साची साद या विद्यार्थीनीचा समावेश आहे.
यासोबतच गोव्यातील झुर्यीनगर येथील एम.इ.एस कला व वाणिज्य महाविद्यालयाचा प्रवीण हिरेमठ या विद्यार्थ्याचा आणि पोंडा तालुक्यातील फार्मागुडी येथील पी.इ.एस. आर.एस.एन. कला व वाणिज्य महाविद्यालाची तृप्ती टिनेकर या विद्यार्थीनीचा या चमुत समावेश आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण १५० पैकी 1०० विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 1० विद्यार्थी- विद्यार्थीनीची निवड होईल असा विश्वास डॉ. पवन नाईक यांनी व्यक्त केला.
परेड कमिटीमध्ये महाराष्ट्र
या एनएसएस सराव शिबिरात सहभागी होणाऱ्या १५ कार्यक्रम अधिकाऱ्यांमधून २६ जानेवारी रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी एका पुरुष व एका महिला कार्यक्रम अधिकाऱ्याची निवड करण्यात येते. या अनुषंगाने यावर्षी मानाच्या परेड कमिटीमध्ये महाराष्ट्राचे डॉ. पवन नाईक यांची निवड झाली आहे व २६ जानेवारीला ते एनएसएस दस्त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सहभागी होतील.
महाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात गेल्या एका दशकापासून राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी,आसीफ शेख आणि दर्पेश डिंगर यांनी मिळविला आहे.