मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रिक्त ५६५ पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेसाठी दोन लाख ५८ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते. या परीक्षेत मोठा गैरकारभार झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
म्हाडा मार्फत ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत एक लाख ८० हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. टीसीएसच्या (टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस) माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे . टीसीएसने ६३ संशयित उमेदवारांच्या चौकशीचा अंतिम अहवाल म्हाडाला सादर केला असून त्यानुसार निवड यादीतील ६३ पैकी ६० जण दोषी आढळले आहेत. यापैकी काही तोतया उमेदवार असून काहींच्या परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद आहेत. ‘म्हाडा’ या दोषींविरोधात पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.
‘म्हाडा’तील ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर ‘म्हाडा’ने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारीत परीक्षा घेतल्या. या परीक्षेदरम्यान काही तोतया उमेदवारांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अनुषंगाने ऑनलाइन परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. औरंगाबादमधील एका प्रकरणाचे पुरावे ‘म्हाडा’ला सादर करण्यात आले होते. या पुराव्यांची तापासणी केली असता गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले.
परीक्षेच्या निकालातील निवड यादीतील संशयित ३६ नावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ‘म्हाडा’ला कळविली. त्यानुसार टीसीएसच्या प्राथमिक तपासणी अहवालात धक्कादायक बाब समोर आली. निवड यादीतील ३६ नव्हे तर, ६३ संशयित उमेदवार आढळले. यातून ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकार समोर आला. या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’ने या ६३ जणांचा निकाल राखून ठेवला होता. तसेच टीसीएस आणि ‘म्हाडा’च्या माध्यमातून पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीचा अंतिम अहवाल सादर झाला असून ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झाले. अंतिम अहवालानुसार ६० जण दोषी आढळले असून याप्रकरणी पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी म्हाडा कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी सर्व उमेदवारांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांची ‘बायोमेट्रिक’ तपासणी करण्यात आली. सीसी टीव्ही चित्रणातील त्यांच्या हालचाली तपासण्यात आल्या. त्यांच्या कागदपत्रांची कडक तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेसाठी ६३ संशयित उमेदवारांनाही बोलवण्यात आले होते. मात्र यापैकी केवळ ४७ उमेदवार चौकशीला हजर राहिले होते.
सदर भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक – प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक आदी जागांचा समावेश होता.
MHADA Recruitment Online Exam Malpractice
Vacancy Job Fraud Crime TCS Report