नाशिक – निसर्गाचा लहरीपणा प्रचंड वाढलाय. त्याचा जबरदस्त आर्थिक फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसतोय. हल्ली वर्षातल्या जवळपास प्रत्येक महिन्यात पाऊस पडतोय. गारपीट, अतिथंडी, वादळं, तापमानवाढ ही हवामानाची रुपं शेतकऱ्याला नागवं करुन टाकतात. इतर सर्व संकटांवर कदाचित मात करता येईल, पण नैसर्गिक संकट कसं टाळणारॽ ही संकटं टाळता येणार नाही पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याचा यशस्वी मुकाबला करता येऊ शकतो. अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्म्सने शेतकऱ्यांना परवडतील अशी तीन हवामान केंद्र (वेदर स्टेशन) विकसित केली आहेत.
सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतील अशा तीन प्रकारच्या हवामान केंद्रांची (वेदर स्टेशन्स) निर्मिती व ती उपलब्ध करण्यासही सुरुवात केली आहे. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.
मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सभासदांसाठी सातत्याने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असते. अलीकडील वर्षात ‘सह्याद्री’ने शेतात स्वयंचलित हवामान केंद्रे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स) उभारणी, ‘सॉप्टवेअर डेव्हलपमेंट’ व त्याआधारे सल्ला-मार्गदर्शन असा सामूहिक उपक्रम सुरू केला.अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘प्रिसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती) ही त्याची संकल्पना होती. उत्पादन खर्च कमी करण्यासह प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे साध्य होते. त्याअंतर्गत नऊ स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी शेतकऱ्यांच्या शेतात झाली. देशातील हा वेगळा व स्तुत्य उपक्रम होता.
एक पाऊल पुढे
‘सह्याद्री’ने एक पाऊल पुढे जात आता स्वतःचीच सहयोगी कंपनी सुरू केली आहे. त्याद्वारे अत्याधुनिक व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्यात येतील अशी तीन प्रकारची ‘वेदर स्टेशन्स’ तयार करण्यास व उभारण्यास सुरुवात केली आहे. ‘आयआयटी’ मुंबई येथून इंजिनिअर झालेले व नासा (अमेरिका) या जगप्रसिद्ध संस्थेत सुमारे १२ वर्षे कार्य केलेले डॉ. पराग नार्वेकर भारतात परतले. इस्त्रो, बंगळूर येथील संस्था तसेच तेथील आयआयटी, अमेरिका कृषी विभाग (यूएसडीए) यांच्यासोबत त्यांनी काही प्रकल्पांवर काम केले. त्यानंतर ‘सेन्सरटिक्स’ नावाची कंपनी सुरू केली. आज हीच कंपनी ‘सह्याद्री’ची सहयोगी बनली आहे. ‘सह्याद्री’चे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, की पूर्वीच्या प्रकल्पात परदेशातील कंपनीकडून वेदर स्टेशन्स आयात केली जायची. प्रति स्टेशन किंमत एक लाख ६० हजार रुपये होती. सर्वसामान्य शेतकऱ्याला ते विकत घेणे, विविध प्लॉटमध्ये त्यांची उभारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. आता आम्हीच कंपनी स्थापन करून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तीन प्रकारांत वेदर स्टेशन्स विकसित केली आहेत. त्यात दिलेल्या सुविधांनुसार बाराहजार रुपयांपासून ६० हजार रुपये एवढ्या कमी किमतीत ती उपलब्ध केली आहोत.
असे आहेत तीन प्रकारचे अत्याधुनिक हवामान केंद्र
स्केलर स्टेशन
-
द्राक्ष किंवा कोणत्याही शेतीत उत्पादन खर्च पर्यायाने अन्नद्रव्ये व कीडनाशकांवरील खर्च कमी करणे गरजेचे असते. त्यादृष्टीने पीक वाढीच्या प्रत्येक अवस्थेत सर्वेक्षण (मॉनिटरिंग) व सिंचन नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. या स्टेशनमध्ये वापरलेले सेन्सर्स माती व कॅनोपी यांवर देखरेख करतात.
-
यातील सेन्सर्स मातीच्या खाली मुळांच्या कक्षेत विविध थरांत ठेवलेले असतात.
-
ते मातीतील ओलावा, मातीतील इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व तापमान मोजण्याचे कार्य करतात.
-
कॅनोपीत हे सेन्सर्स सापेक्ष आर्द्रता, कॅनोपी तापमान आणि पानांतील ओलावा मोजतात.
-
जर या दोन बाबी योग्य वेळेत समजल्या तर बुरशीजन्य किंवा अन्य कोणत्याही रोगाच्या प्रादुर्भावाबाबत बऱ्याच आधी पूर्वानुमान देणे किंवा भाकीत करणे शक्य होते. त्यातून पिकाच्या विशिष्ट अवस्थेत योग्य, प्रभावी व प्रतिबंधक उपाय करणे शक्य होते.
-
विविध प्लॉटमध्ये विविध व्यवस्थापन सुरू असते. त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये स्केलर स्टेशन उभारून कॅनोपी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे साधता येते.
ट्रेसर स्टेशन
-
हे स्केलर स्टेशनच्या पुढील व्हर्जन आहे. स्केलर स्टेशनमधील सर्व सेन्सर्स व सुविधांचा यात समावेश.
-
त्या व्यतिरिक्त ‘पाणी व्यवस्थापन’ हा यातील महत्त्वाचा घटक. जगातील सर्वोत्कृष्ट रेनगेज (पाऊस मोजण्याचे उपकरण) यात आहे. पीकविमाधारकांसाठी हा घटक महत्त्वाचा ठरणारा आहे.
-
हवामान सेवा, प्रसारमाध्यमे, इंटरनेट आदींच्या माध्यमातूनही गाव किंवा तालुका स्तरावर
-
पाऊस, थंडीची लाट आदींबाबतची माहिती शेतकऱ्यांना समजते. मात्र ‘वॉटर बॅलन्स इक्वेशन’ काढण्यासाठी आपल्या वैयक्तिक शेतात होणाऱ्या पावसाची माहिती असणे गरजेचे आहे.
-
त्या दृष्टीने पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन नियोजन हंगामापूर्वीच करणे सोपे होते.
-
रेनगेज आपल्या स्वतःच्या शेतात उभारलेले असल्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालेला पाऊस समजतो. या सुविधेमुळेच पीकविमा योजनेसाठी हा मुद्दा सर्वांत आधारभूत ठरू शकतो.
मास्टर स्टेशन
-
स्केलर’ व ‘ट्रेसर’ या दोन्हींच्या पुढील व्हर्जन म्हणजे मास्टर स्टेशन. प्रिसिजन फार्मिंग’साठी सर्वसुविधांनी युक्त अद्ययावत.
-
आधीच्या दोन्ही स्टेशन्समधील सेन्सर्स व सुविधांव्यतिरिक्त वाऱ्याचा वेग, दिशा, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक सूर्यकिरणे, बाष्पीभवन (इव्हॅपो ट्रान्सपिरेशन), हवेचा दाब आदी बाबी माहीत करून घेता येतात.
-
आपल्या कॅनोपीतील व स्थानिक भागातील आर्द्रता व तापमान यांच्यातील फरक समजून घेता येतो.
-
‘ट्रेसर’ व ‘स्केलर’ स्टेशन्सच्या तुलनेत यात सेन्सर्सची संख्या अधिक आहे. साहजिकच व्यापक क्षेत्रावर म्हणजे पाच बाय पाच किलोमीटर परिघापर्यंत त्याचा वापर करता येतो. म्हणजेच गाव स्तरावर हवामानाच्या नोंदी संकलित करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
-
व्यापक क्षेत्रावर म्हणजे पाच बाय पाच किलोमीटर परिघापर्यंत त्याचा वापर करता येतो. म्हणजेच गाव स्तरावर हवामानाच्या नोंदी संकलित करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
-
शेतकरी समूहाद्वारे एकत्र येऊन सामाईक स्तरावर त्याचा वापर करू शकतात. त्यावरून प्रादेशिक किंवा स्थानिक स्तरावरील हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात येऊ शकतो. तर ट्रेसर व स्केलर स्टेशनचा उपयोग आपल्या वैयक्तिक शेतात प्लॉटचा आकार व गरजेनुसार करता येऊ शकतो.
-
मास्टर स्टेशन’द्वारे संकलित झालेल्या डाटाचा वापर संबंधित कृषी हवामान विभागासाठी किंवा अधिक व्यापक क्षेत्रासाठी हवामान अंदाज देण्याच्या अनुषंगाने करता येईल.