इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मर्सिडीजमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार एका आमदाराची आहे. एका आमदाराच्या मुलाचा बलात्कार प्रकरणात सहभाग असल्याची पुष्टी पोलिसांनी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी आमदाराच्या मुलासह अल्पवयीन आहेत. मात्र, घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा कॅफेमध्ये बसला होता, असा दावा आमदार कुटुंबीयांनी केला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष त्या पार्टीत उपस्थित होते जिथे पीडित मुलगी देखील होती. इंडिया टुडेच्या म्हणण्यानुसार, पीडितेला फक्त एका आरोपीची ओळख पटवण्यात आणि नाव देण्यात यश आले आहे. पीडित तरुणी सध्या शॉकमध्ये असून उर्वरित आरोपींची ओळख पटवण्यास असमर्थ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीला आरोपीसोबत मर्सिडीज कारमध्ये बसण्यास सांगण्यात आल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. तेथे आरोपींनी तिच्या मानेवर वार केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर, पोलिसांनी एफआयआरमध्ये कलम 376 (सामूहिक बलात्कार) सोबत पॉक्सो कायदा आणि आयपीसीचे कलम 354 जोडले. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू आहे.