मुंबई – जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी वाहन उत्पादक असलेल्या मर्सिडीज बेंझ कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘मेड-इन-इंडिया’ एस-क्लास सेडान कार लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे या कारची निर्मिती पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये करण्यात आली आहे.
मर्सिडीज बेंझ कंपनीची ही कार पूर्णपणे भारतात तयार केली जाते. अत्यंत आकर्षक देखावा आणि मजबूत इंजिनने सजलेल्या या कारची सुरुवातीची किंमत 1 कोटी 57 लाख रुपये (एक्स-शोरूम ) निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, कंपनी एस-क्लास सेडान कार भारतात पूर्णतः बिल्ट युनिट (सीबीयू) मार्गाने आणली जायची. त्यामुळे या कारची किंमत खूप जास्त होती, म्हणजे त्यावेळी या कारवर जास्त आयात शुल्क असल्यामुळे त्याची किंमत 2 कोटी 17 लाख रुपये होती. आता ती भारतात बनवल्यामुळे या कारच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे.
मर्सिडीज बेंझचा दावा आहे की, आता पर्यत एस-क्लासच्या 8,250 पेक्षा जास्त युनिट्स भारतात विकल्या गेल्या असून एस-क्लासच्या सीबीयू युनिटला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला, म्हणूनच कंपनीने आता या कारची मेड इन इंडिया आवृत्ती येथे लाँच केली आहे. कंपनीला आशा आहे की या नवीन कारलाही ग्राहकांकडून तितकाच प्रतिसाद मिळेल.
कंपनीने नवीन एस-क्लासला एकूण दोन प्रकारांमध्ये सादर केले आहे. त्यात एंट्री लेव्हल व्हेरिएंट एस 350 डी कारची किंमत 1 कोटी 57 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, ग्राहकांना एस 450 – 4 मॅटीक या प्रकारासाठी 1 कोटी 62 लाख रुपये द्यावे लागतील. ही नवीन कार बाजारात आल्यानंतर कंपनी आता चाकण येथील आपल्या कारखान्यात आणखी एकूण 13 कारचे उत्पादन करत आहेत.