नाशिक – भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने सेवा बजावून दुचाकीवर घराकडे परतणाऱ्या ग्रामिण पोलीस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील शेरे पंजाब ढाबा परिसरात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारचालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सद्दाम कयुब उर्फ बबलू कुरेशी (३२ रा.कुरेशी नगर,वडाळानाका) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव असून या घटनेत चंद्रकांत तात्याराम गोंदकर (५६ रा.ओझर) या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला. गोंदकर नाशिक तालुका पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
रविवारी (दि.११) रात्री ते सेवा बजावून आपल्या घरी ओझर येथे जात असतांना हा अपघात झाला. एमएच १५ एफए १५६२ या दुचाकीने ते ओझरच्या दिशेने प्रवास करीत असतांना महामार्गावरील आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाबा समोर पाठीमागून भरधाव आलेल्या मर्सिडीज कारने (एमएच १५ बीसी ७७७७) दुचाकीस धडक दिली.
अपघात इतका भयंकर होता की मोकळा रस्ता असतांना कारने दुचाकीस दुरवर ओढत नेली. या घटनेत जखमी गोंदकर यांना फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला होता. मात्र पोलीसांनी त्यास हुडकून काढले असून याप्रकरणी हवालदार बस्ते यांच्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.