नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यातच या निवडणुकीदरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे. वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा शहरात गुजरात एटीएसने तब्बल ४७८ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक अंमलबजावणी संस्थाच्या माध्यमातून केलेले सूक्ष्म नियोजन, सर्वसमावेशक आढावा आणि खर्चावरील देखरेख यामुळे गुजरात राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी जप्ती झाली आहे. वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा शहरात एटीएस गुजरातच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे. या पथकाने 2-मेफेड्रोन ड्रग निर्मिती कारखान्यातून सुमारे ४७८ कोटी रुपयांचे अंदाजे १४३ किलो मेफेड्रोन (सिंथेटिक ड्रग) उघडकीस आणले आहे. त्यांनी नडियाद आणि वडोदरा येथून ५ जणांना ताब्यात घेतले असून एनडीपीएस कायदा, १९८५ च्या संबंधित कलमांतर्गत अहमदाबाद येथील एटीएस पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई अद्याप सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावर संपूर्ण तपशील उपलब्ध केला जाईल. गुजरात राज्यात आत्तापर्यंत झालेल्या जप्तीचा आकडा २९० कोटीच्या आसपास आहे. गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पैशाच्या शक्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रभावी देखरेखीसाठी, केंद्रीय निवडणूक आयोगाने ६९ निरीक्षक देखील तैनात केले आहेत.