इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीने आपल्या कुत्र्याच्या प्रेमात असं काही केलं की ऐकणारा प्रत्येक माणूस थक्क होतो आहे. ८२ वर्षीय मुथू यांना त्यांच्या कुत्र्याच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले आहे. ज्यामध्ये कुत्र्याची संगमरवरी मूर्तीही ठेवण्यात आली आहे.
मानव आणि प्राणी यांच्यातील नात्याबद्दल बोलताना कुत्रा हा माणसांचा सर्वात चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते. कुत्र्याचे माणसाशी असलेले नाते इतर प्राण्यांपेक्षा बरेच वेगळे असते. कुत्र्याला माणसांची भाषाही कळते असं म्हणतात. त्याचबरोबर माणसांना काय सांगायचे आहे किंवा काय करायचे आहे हेदेखील कुत्रा ओळखू शकतो. यामुळेच जगभरातील कोट्यवधी लोक कुत्र्यांना मुलांप्रमाणे पाळतात. प्राणी आणि मानवाचे हे सुंदर नाते तमिळनाडूतील मुथू यांच्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हे प्रकरण तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील मनमदुराई भागातील आहे. येथे राहणारे ८२ वर्षीय मुथू यांनी आपल्या कुत्र्याच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर बांधले आहे. मुथूच्या कुत्र्याचे नाव टॉम होते. टॉम सुमारे ११ वर्षे मुथूसोबत राहिला. टॉम आणि मुथू खूप चांगले मित्र होते. दोघांनी एकमेकांसोबत छान वेळ घालवला. गेल्या वर्षी टॉमला असा आजार झाला की औषधंही त्याला बरे करुन शकले नाही आणि तो जग सोडून गेला.
सरकारी कर्मचारी असलेल्या मुथूला टॉमची इतकी आठवण आली की त्यांनी आपल्या शेतात टॉमचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मुथूने त्याच्या लॅब्राडोर टॉमचा पुतळा बनवला. सुमारे ८० हजार रुपये खर्चून तयार झालेला टॉमचा संगमरवरी पुतळा मुथूने आपल्या शेतात मंदिर बांधून बसवला. मुथूने यावर्षी जानेवारीत टॉमची मूर्ती मंदिरात बसवली. या मंदिरात दररोज टॉमच्या मूर्तीची पूजा केली जाते. इतकंच नाही तर टॉमचा आवडता पदार्थही त्याला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. टॉमचे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. म्हणजेच ज्याला टॉमची मूर्ती बघायची असेल तर ते मंदिरात जाऊ शकतात, असे मुथूने सांगितले आहे.