– २२ एप्रिल १९७३ सालची घटना,
– घरातच दोन मिनिटे उभे राहून हुतात्म्यांना आदरांजली
सिन्नर- सिन्नर तालुक्याच्या भीषण दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी २२ एप्रिल १९७३ रोजी निघालेल्या ऐतिहासिक मोर्चात शहिद झालेल्या ५ हुतात्म्यांचा ४८ वा स्मृतीदिन गुरुवारी (दि.२२) साजरा करण्यात येत आहे. या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारी १२ वाजता नगरपरिषदेच्यावतीने भोंगा वाजवण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या घरातच त्यावेळी दोन मिनिटे उभे राहून या हुतात्म्यांना आदरांजली वहावी असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराथी यांनी केले आहे.
सन १९७२ च्या भीषण दुष्काळात हाताला काम, खायला धान्य व प्यायला पाणी मिळावे यासाठी माजी आमदार कै. सुर्यभान गडाख, कै. शंकरराव बाळाजी वाजे, कै. काशीनाथमामा गोळेसर यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली २२ एप्रिल १९७३ रोजी ऐतिहासिक असा मोर्चा सिन्नर शहरात निघाला होता. दुपारी १२च्या दरम्यान मोर्चा नगर पालिका दवाखान्याजवळ आला असताना काही समाजकंटकांनी मोर्च्यावर दगडफेक केली. त्यातून मोर्चाला हिंसक वळण लागले व पोलीसांनी गोळीबार केला होता. त्यात ज्ञानेश्वर विठोबा साठे, अशोक रामभाऊ पगार, चिंतामण रामचंद्र क्षत्रिय, गणपत गंगाधर वासुदेव, अशोक गणपत कवाडे शहीद झाले होते. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी न्यायालयाच्या इमारतीला आग लावली होती. त्यात अनेक खटल्यांची कागदपत्रे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे तालुक्यातील दुष्काळाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. दुष्काळाची भीषणता शासनाच्या लक्षात आली. आणि दुष्काळ हटवण्यासाठी विविध योजना त्यानंरच्या काळात शासनाच्यावतीने खऱ्या अर्थाने राबवण्यास सुरवात झाली. त्यामुळे मोर्चात शाहिद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगर परिषदेसमोरील चौकात स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे.
दरवर्षी स्मृतिदिनी या स्मृतिस्तंभावर स्मारक समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येते. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकारातून तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेने १२ वाजता भोंगा वाजवून सिन्नरकरांना हुतात्म्यांची आठवण करून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने शासन नियमाच्या अधीन राहून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे.