नवी दिल्ली – आपल्या शिक्षण व्यवस्थेत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पुढील शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी तसेच आयुष्यारूपी उंच इमारत उभारण्यासाठी हे टप्पे पाया म्हणून समजले जातात. आपला पायाच जर भक्कम नसेल, तर इमारत काही वर्षात खिळखिळी होऊन कोसळते. शैक्षणिक आयुष्याचेही तसेच आहे. देशाचे भवितव्य घडवणार्या राजकीय नेत्यांनीच जर हा पाया खिळखिळा केला तर काय होईल. संसदेच्या अधिवेशनात एका खासदाराने विचित्र मागणी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी आणि गणिताच्या प्रश्नपत्रिकेत खूपच कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासताना उदारता दाखवून गुण द्यायला हवे, अशी मागणी केरळच्या क्रांतिकारी समाजवादी पार्टी (आरएसपी) चे नेते एन. के. प्रेमचंद्रन यांनी केली.
लोकसभेच्या शून्य प्रहरात त्यांनी मगंळवारी केंद्रीय शित्रणमंत्र्यांकडे ही मागणी केली. ते म्हणाले, विद्यार्थी परीक्षेनंतर खूपच तणावाखाली आहेत. तीन डिसेंबर रोजी झालेल्या इंग्रजीच्या परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सहा डिसेंबरला झालेल्या गणिताच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका खूपच मोठी आणि अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात आले होते.
परीक्षेनंतर विद्यार्थी तणावात आहेत. त्यांचे भवितव्य संकटात आहे. दुसरीकडे काउंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (सीआयएससीई) ने १२ बोर्डाच्या परीक्षेत खूपच सोपे प्रश्न विचारले होते. विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी बारावीचे महत्त्व असल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने उत्तरपत्रिका तपासताना औदार्य दाखवावे अशी मागणी प्रेमचंद्रन यांनी केली.