इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्याल खासदार भेटले. आहेर म्हणून काही गिफ्ट देत होते. तेवढ्यात नववधू म्हणाली आम्हाला हा आहेर नको आहे. आमच्या घरापासून मंदिरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. त्यापेक्षा हा रस्ता चांगला करुन द्या. नववधूचे हे म्हणणे ऐकून खासदार अचंबित झाले. आणि तत्काळ ते म्हणाले येत्या महिन्याभरात हा रस्ता चांगला करुन देतो. त्यांच्या आश्वासनाने सर्वच जण सुखावले आहेत.
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील अलिगड जवळील खैर विधानसभा मतदारसंघातील. कासिसो गावचे रहिवासी असलेले नवीन शर्मा हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा दीपांशू शर्मा दिल्लीत शिक्षण घेतले आणि तो आता नोकरीला आहे. त्याचा विवाह हाथरस येथील बबली शर्मासोबत झाला. बबली ही एमए उत्तीर्ण आहे. दीपांशू आणि बबली या नवदाम्पत्याला भेटायला अलीगडचे खासदार सतीश गौतम त्यांच्या घरी आले. लग्न घरी खासदार आल्याने चांगलीच धावपळ सुरू झाली. त्यांची सरबराई करण्यात आली. त्याचवेळी नवदाम्पत्य हे खासदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. त्याचवेळी खासदार हे या दाम्पत्याला आहेर म्हणून भेटवस्तू देऊ लागले. मात्र, नववधू बबली म्हणाली की, तुम्ही मंदिराकडे जाणारा रस्ता पक्का करा, तोच आमच्यासाठी खरा आहेर ठरेल.
नवविवाहितेची ही बाब तत्काळ खासदारांनी मान्य केली. हा रस्ता पाहण्यासाठी ते तातडीने गेले. मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यामुळे सुमारे दीडशे मीटर लांबीचा चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे तेथे प्रचंड दलदल आहे. स्थानिक नागरिकांना येथे प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन खासदार तातडीने म्हणाले की, येत्या महिनाभरात या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रुपांतर करण्यात येईल. खासदारांचे हे आश्वासनामुळे नवदाम्पत्यासह कुटुंबिय आणि परिसरातील ग्रामस्थ चांगलेच खुश झाले आहेत.