नाशिक – महाराष्ट्रातील प्रख्यात शाहीर मेघराज बाफणा यांचे आज सकाळी वृध्दापकाळतील अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. १९४८मध्ये रविकिरण मेळ्यात बाल कलावंत म्हणून मेघराज बाफणा यांनी काम करण्यास सुरुवात केली. १९५२ मध्ये त्यांनी स्वतःचा साईनाथ मेळा स्थापन केला. पुढे १९५६ ला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये ते सहभागी झाले आणि लोक लोकनाट्याच्या माध्यमातून, कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संदर्भात जनजागृती करण्याचे काम त्यांनी शाहीर गजाभाऊ बेणी यांच्यासमवेत केलं. त्यानंतर १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी लोकमान्य कलापथकाद्वारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक गाजलेल्या लोकनाट्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असायची. लोकनाट्यामध्ये सादर केली जाणाऱ्या गण गवळणीत ते पेंद्याची भूमिका करीत. या भूमिकेसाठी शाहीर मेघराज बाफना हे प्रसिद्ध होते. ते उत्तम नकलाकार होते. कला पथकामध्ये त्यांनी सादर केलेल्या नकला आणि घेतलेले उखाणे हे रसिक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. शाहीर गजाभाऊ बेणी आणि शाहीर मेघराज बाफणा ही जोडगोळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. त्यांच्या लोककलेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता. मेघराज बाफणा यांच्या निधनामुळे एक उत्तम नकलाकार आणि चांगल्या लोककलावंताला आपण मुकलो आहोत. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, दोन मुली, जावई, नातवंडे असा परीवार आहे.