नवी दिल्ली – देशाला कोट्यवधींचा चुना लावून पळालेला मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चोक्सी अँटिगुआ आणि बारबुडा येथून गूढरित्या गायब होण्यास कारणीभूत मानल्या जाणार्या प्रेयसीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मूळची कॅरिबियन असलेल्या बबारा जराबिका हिला चोक्सी डिनरसाठी एका नावेत डॉमिनिका येथे घेऊन गेला होता. त्यादरम्यानच त्याला सीआयडीने ताब्यात घेतले. त्यानंतर बबारा तेथून गायब झाली आहे.
पेशाने गुंतवणूक सल्लागार असलेली बबारा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर आहे. ती एका वर्षापूर्वी चोक्सीच्या संपर्कात आली होती. दोघेही लपूनछपून भेटीगाठी घेत असतानाच त्याचे रूपांतर प्रेमात झाले. बबारा ही खूपच बोल्ड असून, तिला आलिशान आयुष्य जगायला आवडते. तिला यॉटद्वारे समुद्राच्या लहरींवर आनंद घ्यायला आवडते, असे तिच्या
तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटो आणि व्हिडिओवरून लक्षात आले आहे. काही फोटोमध्ये ती हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसत आहे. इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर तिने प्रवास, व्यवसाय आणि खेळामध्ये आवड असल्याची नोंद केली आहे.
डॉमिनिकामध्ये चोक्सीच्या अटकेबाबत गूढता वाढत असताना चोक्सीचे अपहरण करून अँटिगुआच्या बाहेर नेल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. भारताशी संपर्क असलेल्या लोकांनी अँटिगुआच्या अधिकार्यांशी संगनमत करून चोक्सीचे कथितरित्या २३ मेस अपहरण केले, असे वकिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. एका जहाजातून डॉमिनिका येथे नऊन त्याला अटक करण्यात आली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, चोक्सीला आपल्या प्रेमिकेमुळे अटक झाली आहे. ती महिला अँटिगुआमध्ये राहात होती. सकाळ संध्याकाळ फिरत असताना तिची चोक्सीसोबत ओळख झाली. तिला भेटायला गेल्यावर काही लोक त्याचे अपहरण करून डोमिनिका येथे घेऊन गेले. तिथेच त्याला अटक करण्यात आली.