तुझे आहे तुजपाशी
– परि जागा तू चुकलासी
बऱ्याचदा असं होतं की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्या जवळपासचं असते पण त्यासाठी आपण सगळ्या जगाला वेढा मारून येतो… मी इतके वर्षे झाले तिरुपती बालाजीला सलग दरवर्षी जातो आणि त्याचं श्री बालाजीचे एक नितांत सुंदर, अफाट, अद्वितीय असे मंदिर आपल्याचं महाराष्ट्रात अगदी हाकेच्या अंतरावर आहे…
मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर…
आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद पासून १५० किमी, शेगांव पासून केवळ ९० किमी आणि प. पू. सदगुरू प्रल्हाद महाराज साखरखेर्डा येथून २३ किमी अंतरावर इतकं सुंदर आणि अदभुत मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही…तुम्ही शेगांवला, साखरखेर्डाला जाणार असाल तर जरा वाट वेगळी करून येथे अवश्य भेट द्या…काहीतरी उत्तुंग आणि उत्कृष्ट बघायला मिळाले याची अनुभूती येईल…
प्राणहिता किंवा पैनगंगा या नदीच्या काठी हे मंदिर आहे…विदर्भाची गंगा संबोधली जाणाऱ्या या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी उलटी म्हणजे दक्षिणेतुन उत्तरेकडे वहाते…( या शहराला लागूनच असलेल्या लोणार सरोवराच्या जंगलात श्रीराम वनवासात वास्तव्यास असताना त्यांनी यांच नदीच्याकाठी वडिलांचा दशक्रिया विधी केला असं म्हणतात…याचं लोणार जंगलात श्रीराम यांनी पिंडदान केले आणि तिथे जंगलात श्रीरामाचे एक खास वैशिष्ट्यपूर्ण मंदिरही आहे, त्यावर एक स्वतंत्र लेख आहे जो जरूर वाचा…)
आज मेहकरमध्ये ज्या ठिकाणी हे श्री बालाजी मंदिर आहे त्याठिकाणी १८८८ मध्ये एका गढीचे बांधकाम करताना एकूण पाच मुर्त्या जमिनीत पुरलेल्या सापडल्या… त्याकाळी मुघलांच्या आक्रमणापासून या मूर्ती वाचवण्यासाठी लोकांनी असे केले असे समजते… जमिनीत चंदनाच्या भूशात पंधरा फूट लांबीच्या पेटीत या मुर्त्या पुरून ठेवल्या होत्या…या पाच पैकी एक अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती श्री बालाजी यांची आहे… पुढे इंग्रजांची नजर या मूर्तीवर पडली आणि त्यांनी ही मूर्ती लंडनला न्यायचा घाट घातला… त्यांचा हा मनुसुबा स्थानिक गावकऱ्यांना समजल्यावर त्यांनी तातडीने मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि कमीतकमी वेळात हे मंदिर बांधून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली…त्यामुळे हा अफाट श्रीमंत ठेवा आपल्याकडे शाबूत राहिला, नाहीतर इतकी गोड आणि प्रसन्न मूर्ती इंग्लंडमध्ये म्युझियम नावाच्या कैदेत काचेच्या पेटीत बंदिस्त झाली असती… मूर्ती वाचली पण तरीही या मूर्ती बरोबर एक ताम्रपट होता तो मात्र इंग्रजांनी आपल्या बरोबर लंडनला नेलाचं… ही श्री बालाजी मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळी ज्या गावकऱ्यांनी मदत केली, प्रयत्न केले त्या सगळ्यांना इंग्रजांनी नंतर कैदेत टाकले आणि त्यांचा अतोनात छळ केला… त्या लोकांचे आपण कायम ऋणी असायला हवं…
या मूर्तीचे खूप सारे वैशिष्ट्य आहेत…ही मूर्ती अकरा फूट पाच इंच उंचीची असून चार फूट रुंद व दोन फूट जाडीची आहे…संपूर्ण जगात इतकी उंच असलेली ही एकमेव मूर्ती आहे… तिरुपती बालाजी पेक्षाही या मूर्तीची उंची जास्त आहे…
या मूर्तीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती सोबत श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे… संपूर्ण जगात श्रीलक्ष्मी आणि श्रीबालाजी अशी एकत्रित मूर्ती दुसरीकडे कोठेही नाही… आणि याचंमुळे हे मंदिर खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायण मंदिर संबोधले जाते… श्री लक्ष्मी देवींची नजर श्री बालाजी यांच्या चरणाकडे आहे… याचं मूर्तीच्या दुसऱ्या तळपायाशी श्रींची दुसरी पत्नी श्री भुदेवीची मूर्ती पण आहे… मूर्तीच्या दोन्ही बाजूला जय – विजय या रक्षकांची मूर्ती आहे… या सगळ्या मुर्त्या अगदी सुबक, नाजूक आणि अगदी कोरीवकाम केलेल्या आहेत…
श्री बालाजींच्या शिर्षभागी शारंगधर रुपात श्रींचे रूप असल्याने या मूर्तीला शारंगधर बालाजी असे म्हणतात… शारंग नावाचे एक धनुष्यबाण होते ज्याने त्यांनी मेघनकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता… यांच कारणाने या गावाला मेहकर असे नावं पडले… या मूर्तीच्या दोन्ही बाजूला विष्णूचे दशावतार कोरलेले असून मूर्तीच्या मस्तकी भागाच्या प्रभावळीत ब्रम्हा विष्णू महेश यांचे दर्शन होते… त्यामुळे या मूर्तीला बालाजीचे त्रिविक्रम रूप असेही म्हणतात…
केवळ एका उभ्या काळ्या पाषाणापासून बनवलेली ही भरीव मूर्ती इतकी आखीव रेखीव आहे आणि कोरीव काम इतके सूक्ष्म आहे की श्री बालाजी यांची बारीक नखे, अगदी तळ हातावरच्या भाग्यरेषाही अगदी सुस्पष्टपणे दिसतात…
मूर्ती अगदी प्रसन्न, निरागस, आणि हास्यवदन असून मूर्तीकडे बघताच एक आनंदी भाव आपल्या चेहऱ्यावर उमटतो…या मूर्तीचे एक वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या नजरेने त्या मूर्तीकडे बघाल ते भाव त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसतात… तुम्ही हसून बघाल तर मूर्ती तुमच्याकडे हास्यवदनाने बघतेय असे दिसेल, तुम्ही दुःखी मनाने बघाल तर मूर्तीच्या चेहऱ्यावर करुण भाव उमटताना दिसतील… म्हणून या मूर्तीला आत्मरूप दर्शन असेही म्हणतात… प्रातःकाळी ही मूर्ती बाल रुपात, सकाळी तारुण्यरुपात आणि मध्यानकाळी वृध्द रुपात दिसते… त्या मूर्तीकडे पाहिलं की आपली दृष्टी खिळून जाते आणि अखंडपणे त्या मूर्तीकडे बघतचं रहावं असं वाटतं इतकी ही मूर्ती आनंदी आणि प्रसन्न आहे…
मंदिराचे स्थापत्यही अलौकिक असेच आहे… भल्या मोठ्या सभा मंडपात आरामात बसून तुम्ही सहजी दर्शन घेत नामस्मरण करू शकता…
याच मंदिराच्या मागच्या बाजूला श्री गणेश, श्री दुर्गा, श्री हनुमान यांची मंदिरे आहेत… या मूर्ती बरोबर सापडलेली श्री केशवराज यांची काळ्या पाषाणातील मूर्ती अवश्य बघा… हे केशवराज म्हणजे श्री बालाजी यांचे मोठे बंधू… मागच्या बाजूला ते मंदिर आहे…
अरे हो अजून एक वैशिष्ट्य सांगायचे राहिले… ते वैशिष्ट्य असे श्री बालाजी यांच्या हातातील शंख, चक्र, गदा, पद्म हा क्रम वेगळा आहे… श्री विष्णू रूपातील मूर्तीत उजव्या खालच्या हातात गदा, मग उजव्या वरच्या हातात चक्र आणि डाव्या वरच्या हातात शंख असतो, जे सहसा सर्वच मूर्ती मध्ये आढळतो पण या ठिकाणी श्री बालाजी मूर्ती मध्ये हा क्रम वेगळा आहे… श्री बालाजी यांच्या डाव्या खालच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र आणि उजव्या वरच्या हातात गदा आहे… माझ्या माहितीनुसार या प्रकारच्या मूर्तीला श्री विष्णूचे प्रद्युम्न मूर्तीरूप असे म्हणतात…
यांच मंदिराच्या समोर श्री बालाजी यांचे वाहन गरुडाचे मंदिर आहे, सध्या ते मोडकळीस आले असून त्यातली गरुडाची मूर्ती काढून आता मुख्य मंदिरात आणून ठेवली आहे… या गरुड मंदिराची एक खास बाब अशी या मंदिरातून जे प्रतिबिंब दिसायचे त्यात श्री बालाजी हे गरुडावर आरूढ झालेले आहेत याची प्रचिती यायची…
या बालाजी मंदिराच्या समोर जरा खालच्या बाजूला जवळपास शंभर वर्षे जुने माहुरच्या रेणुका मातेचे मंदिर आहे… जरासे भूगर्भात असलेल्या मंदिराला जरूर भेट द्या…
अगदी आवर्जून वेळ काढून भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे… मेहकर पासून वीस किमी अंतरावर जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे… हा एक अचंबित करणारा प्रकार आहे… शेगांव – साखरखेर्डा – लोणारसरोवर आणि मेहकर श्री बालाजी दर्शन अशी दोन तीन दिवसाची कौटुंबिक सहल अवश्य होऊ शकते… मोठे ही खुश होतील आणि लहानांना लोणार सरोवर बघून नक्कीच आनंद होईल… मेहकर मध्येच श्री नृसिंहाचे तेराव्या शतकातील मंदिर आहे, तेथेही अवश्य भेट द्या… या मेहकरच्या आजूबाजूला काही किमी अंतरावर असलेले देऊळगाव राजा आणि वाशीम या शहरात देखील श्री बालाजी यांचे मंदिर आहे… असं म्हणतात की या तिन्ही बालाजींचे दर्शन घेतले की श्री तिरुपती बालाजी दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते…
आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सोडलेला हा इतिहास, हा वारसा, हे दुर्मिळ वैभव, ही हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे… त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला हे बघायला, अनुभवायला मिळेल… आपल्या पूर्वजांनी यासाठी घाम गाळला, आपले रक्त सांडले…आपण किमान आपले शब्द तर नक्कीच पेरू शकतो…
या मेहकर पासून समृध्दी महामार्ग जात आहे आणि त्यामुळे या दुर्लक्षित तिर्थक्षेत्राला समृद्धी प्राप्त होवो ही श्री बालाजी चरणी प्रार्थना.
शारंगधर बालाजी मंदिर…मेहकर, जि बुलढाणा
डॉ. प्रवीण महाजन, जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.
सदस्य – चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती, महाराष्ट्र शासन
Mehkar Shree Balaji Mandir Temple History and Features
Buldhana Shegaon