नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा देशभरात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जातो असून याचा उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिरंगा आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला ठेवत यात आपला सहभाग नोंदवला आहे. तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतंच आपला ट्विटरचा डीपी बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केला असून 2015 च्या एका रॅलीतील हा फोटो आहे. त्यासमोर तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आला असून याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर डीपी बदलला खरा. पण त्यांनी नुसता तिरंगा न लावता त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र बसलेला फोटो आणि त्यांच्यासमोर राष्ट्रध्वज आणि आता अवैध असलेला जम्मू – काश्मीरचा ध्वज दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले होते की ‘आझादी का अमृत महोत्सव’ ने जनआंदोलनाचे रूप धारण केले आहे. त्यांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवर तिरंगा लावण्याची विनंती केली होती. पण मेहबुबा मुफ्ती यांनी डीपी बदलत म्हटले की त्यांचा ध्वज जम्मू आणि काश्मीरमधून “हडपला” गेला असेल, परंतु लोकांच्या सामूहिक जाणीवेतून तो पुसला जाऊ शकत नाही.
सामनाच्या अग्रलेखात यावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय?”, असा सवाल सामनातून शिवसेनेने विचारलाय. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे”, असे आजच्या सामना अग्रलेखात म्हणण्यात आले आहे. चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले.
चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 80 हजार वर्ग फूट जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.
पीडीपीच्या अध्यक्षा व आझाद कश्मीरच्या समर्थक मेहबुबा मुफ्ती यांनी सरळ भारतीय सार्वभौमत्वालाच आव्हान दिले. श्रीमती मुफ्तींकडून त्यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर कश्मीरचा ध्वज फडकवला. तिरंग्याच्या बाजूला कश्मीरचा ध्वज, असे हे चित्र आहे. कश्मीरातून 370 कलम रद्द केले, तसा हा त्यांचा स्वतंत्र ध्वजही रद्द केला. मोदी व अमित शहा प्रभृतींनी कश्मीर आता शंभर टक्के हिंदुस्थानचे अविभाज्य अंग झाल्याचे जाहीर करून आनंदोत्सवही साजरे केले, पण कश्मिरी पंडितांचे हाल असोत की फुटीरतावाद्यांचे दळभद्री खेळ, काहीच बदलल्याचे दिसत नाही. फुटीरतावादी संघटनांचे विषारी नाग फूत्कार सोडीतच आहेत.
स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या ‘यंग इंडिया’, ‘नॅशनल हेराल्ड’ लाच टाळे ठोकले जात आहे. मुंबईत संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अडकवून ‘सामना’चा आवाज व लढा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘हेराल्ड’ व ‘सामना’ ही दोन्ही माध्यमे प्रखर राष्ट्रवादी आहेत हे महत्त्वाचे, पण कधीकाळी भाजपच्या गळय़ात गळा घालून राजकारण करणाऱ्या, फुटीरतावादाचे विष आजही पेरणाऱ्या आणि आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर ‘कश्मीर’चा ध्वज फडकविणाऱ्या मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रातील सरकारमध्ये नाही.
दरम्यान, मेहबूबा यांच्या ट्विटर अकाऊंटवरील फोटो नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या रॅलीचा आहे, त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद हे तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. मेहबूबा यांनी ट्विट केले की, “ध्वज हे आनंद आणि अभिमानाचे प्रतीक असल्याने मी माझा डीपी बदलला आहे. आपल्या राज्याचा ध्वज भारतीय ध्वजाशी जोडलेला होता, जो बदलता येत नाही. तुम्ही आमचा ध्वज आमच्याकडून हिसकावून घेतला असेल, पण आमच्या सामूहिक जाणीवेतून तो पुसला जाऊ शकत नाही.’
विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने राज्यघटनेतील कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरमधून विशेष दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा ध्वज अवैध ठरला. मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू व काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. काही काळ ते व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री राहिले होते.
दरम्यान, २०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालात झाली. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदावर आली.
मेहबूबा मुफ्ती सईद ही भारत देशाच्या जम्मू व काश्मीर राज्याची माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाची अध्यक्ष आहे. वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल २०१६ मध्ये सत्तेवर आलेली मेहबूबा मुफ्ती राज्याची पहिलीच महिला मुख्यमंत्री होती. २०१८ साली भारतीय जनता पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुफ्तीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतला व जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले. तेव्हा कायदा व सुव्यवस्थेसाठी मेहबूबा मुफ्तीला काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
PDP Leader Mehbooba Mufti Twitter DP Kashmir Flag Social Media Troll