इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेतकऱ्यांच्या आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करून मोदी सरकारला अस्वस्थ करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक येत्या ३० सप्टेंबर रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. भविष्यात निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होणार नसले तरी चळवळीशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय भविष्यात पुस्तक लिहिण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून लाच दिल्याच्या आरोपाचा सामना करणारे सत्यपाल मलिक म्हणाले की, राज्यपाल पद सोडताच सीबीआय या प्रकरणी त्यांची चौकशी करू शकते.
मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गतवर्षी १७ मार्च रोजी केलेल्या विधानाने बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी मलिक यांनी देशाच्या राजधानीत कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले होते की, कुत्री मेली तरी नेते शोक करतात पण इथे २५० शेतकरी मेले आणि कोणी काही बोलले नाही.
मलिक यांनी माध्यमांशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ३० सप्टेंबर रोजी राज्यपाल पदावरून निवृत्त होत असले तरी सक्रिय राजकारणात येण्याऐवजी चळवळीत उतरायला आवडेल, असे ते म्हणाले. पुस्तक लिहिण्याबाबतही ते बोलले. मोदींच्या कारकिर्दीत चार राज्यांतील बदल्यांवर मलिक म्हणाले की, मला यावर आत्ताच काही बोलायचे नाही, मात्र निवृत्तीनंतर यावर बोलू.
शेतकरी आंदोलनादरम्यान सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात मलिक म्हणाले की, मी कोणचाही विरोधात बोललो नाही. माझा मुद्दा समजला असता तर आज शेतकऱ्यांनी त्यांचा जयजयकार केला असता. मात्र, सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात मलिक यांची चार राज्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांना लाच देऊ करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. यावर आताच काहीही बोलणार नसल्याचे मलिक यांनी सांगितले. निवृत्तीनंतर ते सीबीआयला याबाबत सांगेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
Meghalaya Governor Satyapal Malik on after Retirement CBI Enquiry