नवी दिल्ली – देशभरातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष अडचणीत येताना दिसत आहे. मेघालयमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या १८ पैकी तब्बल १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आता मेघालयातील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.
काँग्रेस पक्षाचे हे सर्व आमदार शिलाँगमध्ये टीएमसीमध्ये दाखल झाले. कारण व्हिन्सेंट एच. पाला हे मेघालय प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्षपदी विराज झाल्यानंतर त्यांच्यात आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मुकुल एम. संगमा यांच्यात सुरळीत नव्हते असे म्हटले जाते. गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुकुल संगमा आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व्हिन्सेंट एच पाला यांचीही भेट घेतली होती.
पाला यांच्या नियुक्तीनंतर संगमा म्हणाले होते की, पक्ष नेतृत्वाने या संदर्भात त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही. तेव्हापासून नाराज असलेले संगमा देखील टीएमसीमध्ये सामील होतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे आता संगमा यांच्यासह एकूण १२ आमदारांनी पक्ष बदलून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते संगमा हे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे आमदार एचएम शांगपलियांग यांनी राज्यातील तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) पक्षाचे हे आमदार सामील झाल्याची माहिती दिली. तर टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने दावा केला की, नवीन आमदारांच्या पक्षात येण्यामुळे तृणमूल काँग्रेस राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. मेघालयमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.