शिलाँग (मेघालय) – शरण आलेल्या एका माजी दहशतवाद्याला पोलिसांनी गोळ्या घातल्याच्या घटनेवरून देशाच्या स्वातंत्र्यादिनीच (१५ ऑगस्ट) हिंसाचार भडकला. यादरम्यान मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री अज्ञात दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
एका वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अप्पर शिलाँगच्या थर्ड माईलमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाच्या आवारात एका वाहनातील दहशतवाद्यांनी पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या फेकल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. यात पहिली बाटली परिसराच्या पुढच्या भागात फेकली गेली, तर दुसरी बाटली मागील बाजूस फेकली गेली.
स्वातंत्र्यदिनी राज्याची राजधानी शिलाँगसह लगतच्या भागात तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असून चार जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी घातली. दरम्यान, मेघालयचे गृहमंत्री लखमेन रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना शरण आलेल्या प्रतिबंधित हायनेवट्रॅप नॅशनल लिबरेशन कौन्सिलचे स्वयंभू सरचिटणीस चेरिस्टरफील्ड थांगखियू यांच्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. त्यापुर्वी राज्यातील आयईडी स्फोटांच्या संदर्भात त्याच्या घरावर छापे टाकताना पोलिसांच्या चमूवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना थांगखियू याची दि. १३ ऑगस्ट रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.