नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसर्या आघाडीसाठी विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना पुन्हा वेग आला आहे. इंडियन नॅशनल लोकदलचे अध्यक्ष ओम प्रकाश चौटाला यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीत विरोधी पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर तिसर्या आघाडीचे गठण करण्यासाठी या भेटीगाठींकडे पाहिले जात आहे.
ओम प्रकाश चौटाला यांनी तिसर्या आघाडीचे समर्थन केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्रामला जावून चौटाला यांची भेट घेतली होती. त्यानंतर समाजवादी पार्टीच्या नेत्यांचे भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा मुलायम सिंह यादव आणि शरद यादव यांची भेट घेतली होती. चौटाला यांनी सोमवारी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. देशात राजकीय पर्याय देण्याबाबतही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी तिसर्या आघाडीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
ममता बॅनर्जींची भेट शक्य
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चौटाला लवकरच भेट घेण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला स्व. ताऊ देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त होणार्या कार्यक्रमासाठी चौटाला या नेत्यांना आमंत्रण देत आहेत. देवीलाल यांच्या जयंतीपूर्वी चौटाला सर्व विरोधी पक्षांशी संपर्क करत त्यांना आमंत्रण देत आहेत. कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासह ते तिसर्या आघाडीचे गठण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी हितगुजही करणार आहेत. विरोधी पक्षांचे एकमत होणार असेल तर भाजपला पराभूत करण्यासाठी ताऊ देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त होणार्या कार्यक्रमात विरोधी पक्षांच्या उपस्थितीत तिसर्या आघाडीची घोषणा केली जाऊ शकते.
वाढदिवसाची मेजवानी अन्
माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना रात्रीभोजसाठी सोमवारी निमंत्रित केले होते. सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त मेजवानी देण्यात आली होती. परंतु या मेजवानीच्या पडद्यामागून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि डीएकेसह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. काँग्रेसकडून शशी थरूर आणि आनंद शर्मा मेजवानीसाठी पोहोचले होते. असंतुष्ट नेत्यांमध्ये या देन्ही नेत्यांचा समावेश आहे.
https://twitter.com/ANI/status/1424760107905159170