नवी दिल्ली – विमाधारकाच्या वैद्यकीय परिस्थितीचे एकदा निरीक्षण करून पॉलिसी दिल्यानंतर सध्याच्या वैद्यकीय परिस्थितीचा हवाला देऊन विमा कंपन्या दावे फेटाळू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच विमाधारकांना दिल्या जाणार्या माहितीमध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा खुलासा करणे विमा कंपन्यांचे कर्तव्य आहे, न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालय म्हणाले, की प्रस्तावित विम्याशी संबंधित सर्व तथ्य आणि परिस्थिती प्रस्तावकाला ठाऊक असते असे मानले जाते. प्रस्तावकाला जी माहिती ठाऊक आहे तीच प्रकट करू शकतो. परंतु प्रस्तावकाकडून सांगण्याचे कर्तव्य त्याच्या वास्तविक ज्ञानापर्यंत मर्यादित नाहीये. ते कामकाजाच्या सामान्य प्रक्रियांमध्ये जाणून घेण्याच्या त्याच्या भौतिक तथ्यांपर्यंत विस्तारित आहे. मनमोहन नंदा यांनी राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. अमेरिकेत झालेल्या वैद्यकीय खर्चाचा त्यांचा दावा फेटाळण्यात आला होता.
रुग्णाला हायपरलिपिडिमिया आणि मधुमेह हे आजार होते. रुग्णाने विमा पॉलिसी खरेदी करताना या आजारांचा खुलासा केला नव्हता, असे सांगत विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळला होता. त्यावर तक्रारकर्ते स्टेटिन औषध घेत होते. आरोग्य विमा घेताना त्यांनी याचा खुलासा केला नव्हता. अशा प्रकारे ते आपल्या आरोग्याच्या स्थितीची योग्य माहिती देण्याच्या कर्तव्याचे पालन करू शकले नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने काढला होता. परंतु युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून दावा फेटाळला जाणे अवैध आहे. हे कायद्याला अनुसरून नाही. असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
एखाद्या व्यक्तीचे अचानक उद्भवलेल्या आजारामुळे नुकसान झाल्यास, नुकसान भरपाईसाठीच मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्याचा उद्देश असतो. हा उद्देश योग्यच असतो. विमाधारक परदेशातही आजारी पडू शकतो. पॉलिसीत नमूद न केलेल्या आजाराने विमाधारक अचानक आजारी पडला असेल, तर विमाधारकाला नुकसानीची रक्कम देणे कंपनीचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
मनमोहन नंदा यांना अमेरिकेत प्रवास करायचा असल्याने त्यांनी ओव्हरसीज मेडिक्लेम बिझनेस अँड हॉलिडे पॉलिसी घेतली होती. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे दूर करण्यासाठी तीन स्टेंट टाकण्यात आल्या. त्यानंतर नंदा यांनी आरोग्य विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता.