नवी दिल्ली – व्यापक स्वरूपात वापरात येणा-या आवश्यक औषधांच्या किमती कमी करण्याची तयारी केंद्रातील मोदी सरकार करत आहे. आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत संशोधन करून सरकारने प्रस्तावित यादीत ३९ नव्या औषधांचा समावेश केला आहे. यामध्ये विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधांशिवाय कर्करोग, मधुमेह, क्षयरोग आणि एड्स या आजारांना लागणार्या औषधांचा समावेश केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरकारने सध्याच्या यादीतून १६ औषधांना हटविले आहे. आता यादीतील ३९९ आवश्यक औषधांच्या किमती घटविण्याची तयारी सरकार करत आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेली संशोधित यादी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांना सुपूर्द केली. आरोग्य मंत्रालयाकडून औषधाची यादी प्रसिद्ध केल्यानंतर औषधे आणि आरोग्य उत्पादनांशी संबंधित स्थायी समितीकडून त्याचे मूल्यांकन केले जाईल. औषधांच्या किमती कमी करण्याची अधिक आवश्यकता आहे. तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशींच्या आधारावरून राष्ट्रीय फार्मास्युटिकल मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडून औषधांच्या अंतिम किमती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के, पॉल यांच्या अध्यक्षतेखाली ठरविल्या जाणार आहेत.