इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रेल्वेत प्रवाशाला अचानक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बोगीमध्ये रुग्णावर उपचार करीत असतानाच राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली. तेव्हा आजारी प्रवाशावर उपचार न करताच वैद्यकीय पथकाने तातडीने रेल्वे बाहेर उडी मारली. या घटनेची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आजारी प्रवाशावर बरौनी रेल्वे स्थानकावर उपचार करण्यात आले होते. माहिती मिळताच समस्तीपूर रेल्वे स्टेशनवर आमचे वैद्यकीय पथकही पोहोचले. प्रवाशांना डॉक्टर औषध समजावून सांगत असतानाच रेल्वे सुरु झाली. त्यामुळे वैद्यकीय पथकाने रेल्वे बाहेर उडी टाकली.
संध्याकाळच्या सुमारास दिब्रुगड-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या एका कोचमध्ये 40 वर्षीय प्रवासी आजारी असल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळाली. रेल्वे स्टेशन गेटजवळ वैद्यकीय पथक पोहोचले होते की, मालगाडीचा डबा कारखान्यातून हटवण्यात येत होता. त्यामुळे सुमारे 15 मिनिटे वैद्यकीय पथक तेथे उभे होते. त्यानंतर वैद्यकीय पथक स्टेशनवर पोहोचले. तेव्हा तेथे राजधानी गाडी उभी होती. डॉक्टरांचे पथक रेल्वेत पोहोचले. त्यांनी आजारी व्यक्तीकडून माहिती घेतली. त्यानंतर उपचार सुरू होताच ट्रेन फलाटावरून निघू लागली. ही बाब लक्षात येताच वैद्यकीय पथकामध्ये घबराट पसरली. त्यामुळे वैद्यकीय पथकाने चालत्या ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली. परंतु सुदैवाने काही अपघात झाला नाही. आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.