अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल करत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षणाची नियामक संस्था असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महर्षी चरक शपथ हा अभ्यासक्रमाचा भाग बनवला आहे. यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना १० दिवसांचा योगा कोर्स करावा लागणार आहे. याशिवाय, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एक्झिट टेस्टही अनिवार्य करण्यात आली असून ती उत्तीर्ण झाल्यानंतरच एमबीबीएसची पदवी दिली जाईल.
एमबीबीएसच्या सध्याच्या बॅचमध्ये सामील होणारे विद्यार्थ्यांना आता महर्षी चरक शपथ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महर्षी चरक शपथ अनिवार्य करण्याची माहिती सरकारने नुकतेच संसदेत स्पष्ट केल्यावर समोर आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिप्पोक्रॅटिक शपथऐवजी चरक शपथ देण्याविषयी अद्याप कोणताही प्रस्ताव नाही.
नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी १० दिवसांचा योग फाउंडेशन कोर्स सुचवण्यात आला आहे, जो दरवर्षी १२ जूनपासून सुरू होईल आणि २१ जून, रोजी योग दिनाला संपेल. मात्र, या १० दिवसांचं नियोजन अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबद्दल कॉलेजेस आपल्या स्तरावर निर्णय घेणार आहेत. सुधारित अभ्यासक्रमात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात सामुदायिक आरोग्य प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे. यासाठी त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्रांना भेट द्यावी लागेल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेली गावे दत्तक घ्यावी लागतील. डॉक्टरांच्या मते, सध्याच्या अभ्यासक्रमात कम्युनिटी मेडिसिनचा अभ्यास तिसऱ्या वर्षात होतो. दुसऱ्या वर्षापासून सुरू होणारा फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी अभ्यासक्रम तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रोहन कृष्णन म्हणतात, “अभ्यासक्रम थोडे बदलले आहेत. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर विषाणूशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांवर लक्ष केंद्रित करायला हवे होते, परंतु सुधारित अभ्यासक्रमात असे काहीही झालेले नाही.