मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणत: ४ हजार ५०० पदे भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरण्याची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यास राज्य शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळानेही मान्यता दिलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झालेली आहे अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्ताने रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे.
या पदांमध्ये मुख्यत्वे तांत्रिक उदा.तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहायक इ. व अतांत्रिक उदा.उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. पदे भरण्यात येणार आहेत. पदभरती बाबतची जाहिरात दोन महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार असून ही पदभरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे विभागाने नियोजन केलेले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास यापूर्वीच मान्यता दिली होती. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या १०० टक्के मर्यादित पदे शासनाच्या विहित धोरणाचा अवलंब करुन भरण्यास शासनाने मान्यता प्रदान केली होती.
Medical Education Department 4500 Posts Recruitment
Minister Girish Mahajan