नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. विविध गैरसोयी आणि महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी कुलगुरु का कट्टा हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी Sw@muhs.ac.in या इ मेलवर पाठवाव्यात. त्यांची नक्की दखल घेतली जाईल, अशी ग्वाही कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली आहे.
शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी ‘कुलगुरु का कट्टा’ उपक्रमातंर्गत ऑनलाईन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी व समस्या येतात. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा याकरीता ‘कुलगुरु का कट्टा’ उपक्रमास महत्वपूर्ण आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या, तक्रारी व सूचना समजून त्यांची दखल यापुढे विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाच केंद्रबिंदु असल्याने या उपक्रमास विद्यार्थ्यांनी होस्टेलमधील अडचणी, स्वच्छतागृहे याबद्दलच्या तक्रारी मांडल्या त्याबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कळविण्यात येईल असे मा. कुलगुरुंनी सांगितले. विद्यापीठातर्फे ऑनलाईन लायब्ररी सुरु करण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याणकारी विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे मत, सूचना व तक्रारींमधून महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत त्यानुसार कार्यपध्दतीत सुधारणा करणे शक्य होईल तसेच विद्यापीठाकडून निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, मा. कुलगुरु यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला ’कुलगुरु का कट्टा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यतातून विद्यार्थ्यांना थेट मा. कुलगुरु यांच्याकडे आपल्या समस्या, सूचना किंवा तक्रारी इ-मेलव्दारा मांडता येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य क्रमाने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, ’कुलगुरु का कट्टा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याशी ऑनलाईन संवाद शक्य आहे. मा. कुलगुरु महोदया यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मध्ये नमुद केलेल्या या उपक्रमाला संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे विद्यापीठाचे युटयुब चॅनलवरुन प्रसारण करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालय प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.