बडोदा – येथील एमएस विद्यापीठाशी संलग्न आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून संचलित गुजरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सोसायटी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याची घटना उघड झाली आहे.
कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याप्रकरणी रॅगिंग समितीने दोन डॉक्टरांना बरखास्त केले असून, तिसर्या वर्षातील पाच विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. या घटनेमुळे रॅगिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एमबीबीएसच्या तिसर्या वर्षातील विद्यार्थ्यांनी दुसऱ्या वर्षातील जवळपास ६० विद्यार्थ्यांची १७ जुलैला रॅगिंग घेतली. त्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना पहाटे चारला झोपेतून उठवून शंभर वेळा उठाबशा काढायला लावल्या. त्यापैकी एका विद्यार्थ्याला उलटी होऊन त्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
जीएमइआरएसच्या रॅगिंगविरोधी समितीने सोमवारी बैठक घेतली. त्यामध्ये दोन डॉक्टरांना निष्काशित करण्यासह तिसर्या वर्षातील पाच विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढून टाकण्याचा निर्णय झाला, अशी माहिती डीन डॉ. वर्षा गोडबोले यांनी दिली. या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू झाली असून, दोषी विद्यार्थ्यांची गय केली जाणार नाही, असे गुजरातच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.