साधारणतः सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारखे काही आजार झाले की अनेक लोक डॉक्टरकडे जाण्या ऐवजी सरळ मेडिकल दुकानात जाऊन आपल्याला पाहिजे त्या गोळ्या किंवा औषध खरेदी करतात. परंतु थेट मेडिकल दुकानातून अशाप्रकारे वेदनाशामक गोळ्या खरेदी करणे त्रासदायकच नव्हे तर किंबहुना आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काही वेदनाशामक गोळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचे ३२५ मिलीग्रॅम पेक्षा जास्त डोस आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे यकृतामध्ये विषबाधा होण्याचा धोका असतो. त्याकरिता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) ३२५ मिलीग्रॅम पेक्षा जास्त संयुक्त डोसच्या पेरासिटामॉलवर बंदी घातली आहे. तरी देखील, उच्च डोस असलेल्या संयुक्त पॅरासिटामॉल गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सर्रासपणे विकल्या जात आहेत. डीसीजीआयने एका महिन्यापूर्वी फार्मास्युटिकल कंपन्यांना ५०० मिलीग्रॅम पॅरासिटामॉल ऐवजी फक्त ३२५ मिलीग्रॅम पॅरासिटामॉल वापरण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर जास्त डोस असलेल्या औषधांची विक्री थांबवण्याची जबाबदारी औषध निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत या दिशेने कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. तर केमिस्ट म्हणतात की, यासंदर्भात आतापर्यंत कोणताही आदेश आलेला नाही. यामुळेच अशी औषधे अजूनही विकली जात आहेत. एवढेच नाही तर डॉक्टर ही औषधेही लिहून देत आहेत.
२४ तासात प्रौढ व्यक्तीला फक्त दोन ग्रॅम पॅरासिटामॉल दिले जाऊ शकते. तसेच ५०० मिलीग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त पॅरासिटामोल टॅब्लेट देखील तीनपेक्षा जास्त वेळा घेऊ नये. यापेक्षा जास्त पॅरासिटामॉलचे सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात. यामध्ये लिव्हर सिरोसिस सारख्या गंभीर आजारांबरोबरच यकृताची विषबाधा समाविष्ट आहे. सध्या बाजारात पॅरासिटामॉल आणि इतर सोडीयमच्या मिश्रणाची १०० हून अधिक औषधे विकली जात आहेत. पॅरासिटामॉलच्या ३२५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त औषधांची बाजारपेठ देखील कोट्यवधींची आहे. शहरात दररोज १० हजारांहून अधिक पट्ट्या विकल्या जातात. पॅरासिटामॉलला परदेशात सुसाईड टॅब्लेट असेही म्हणतात. त्याचा ओव्हरडोज एखाद्या व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकतो असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.