मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईसह राज्यात गोवरने धडक दिली आहे. त्यामुळे हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न कले जात आहेत. त्यामुळे सहा महिन्यांच्या बालकांना गोवर लशीची पहिली मात्रा देण्यात यावी, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबईसह मालेगाव, भिवंडी या शहरांमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. गोवरची लागण झालेल्यांमध्ये लसीकरण न झालेली बालके सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सहा महिन्यांच्या मुलांना गोवरची लस देण्याचे तसेच नऊ महिन्यांवरील बालकांना गोवर लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. केंद्राकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी करून आम्ही लसीकरण वाढवण्यावर भर देऊ, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्राबरोबरच बिहार, गुजरात, झारखंड, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये गोवरची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निती आयोग, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांताचे अधिकारी आणि भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत विविध प्रकाारचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या विभागांमध्ये गोवरची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे, तेथे नऊ महिने ते पाच वर्षांमधील मुलांना लसीचा अतिरिक्त डोस देण्यात यावा तसेच ज्या भागामध्ये गोवरच्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाचे असतील अशा भागात सहा महिने ते नऊ महिन्यांपर्यंतच्या मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात यावी, असे मंत्रालयाचे सहसचिव पी. अशोक बाबू यांनी दिले आहेत.तसेच संशयित रुग्ण तातडीने शोधा, उद्रेक झालेल्या भागांत लसीकरण मोहीम राबवा, ५ ते ६ वर्षांपर्यंत लशीची अतिरिक्त मात्रा द्या, जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करा, मुलांच्या सकस आहारावर भर द्या, जुलाब, श्वसनाचा त्रास असल्यास रुग्णालयात दाखल करा,मुलांना ‘अ’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या द्या रुग्णांवर आठवडाभर विलगीकरणात उपचार करा अशा सूचनाही केंद्राने दिल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने याबाबत माहिती दिली असून त्यानुसार भारतामध्ये गोवर आणि रूबेलाचा पहिला डोस ८९ टक्के तर दुसरा डोस ८२ टक्के बालकांनी घेतलेला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर आणि रूबेलाचे पूर्णत: निर्मूलन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे ठरवलेली आहेत.
Measles Disease Union Government Vaccination Decision