संदीप दुनबळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदियवस वाढत असताना नमुने तपासणीसाठी मुंबईत अवघी एकाच प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेवरही कामाचा ताण वाढत असल्याने गुजरातच्या अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत नमुने तपासणीकामी पाठवण्यात येणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मुंबई, भिवंडी, मालेगाव येथे गोवरचे रुग्ण आढळून आले असून काही बालकांचा मृत्यूही झाला आहे नाशिक जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागात आठ तर शहरी भागात पाच संशयित बालके आढळून आली आहेत. खरे तर आजार फैलावत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून रुग्णाचा शोध घेतला जात आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरातील महापालिकेचे रुग्णालय या ठिकाणी तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई ताण, उशीराने अहवाल
ही सारीच तत्परता योग्य असली तर संबंधित बालकाला खरोखरच या आजाराची लागण झाली किंवा नाही, हे कळण्यासाठी मात्र बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. कारण संशयिताच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविले जातात. संपूर्ण राज्यात ही एकमेव प्रयोगशाळा असून राज्यभरातून नमुने या ठिकाणी पाठविले जातात. त्यामुळे या प्रयोग शाळेवरही ताण वाढला असून त्याचमुळे तपासणी अहवाल हाती येण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे जोपर्यंत अहवाल मिळत नाही तोपर्यँत संबंधित बालकाला या आजाराची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होत नसून पालकांचाही जीव टांगणीला लागत आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून तेरा बालकांचे नमुने पाठविण्यात आले असून अद्यापही अहवालाची प्रतीक्षा आहे.
असाही योगायोग
महाष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात असल्याने राजकीय आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. अशा परिस्थितीत गोवरचे रक्त नमुने तपासणीसाठी गुजरात राज्यातील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. मुंबईतील प्रयोगशाळेवर ताण वाढल्याने सरकारने हा निर्णय घेतला. उद्योगांपाठोपाठ नमुने तपासणीचे कामही गुजरातला गेल्याने या निव्वळ योगायोग समजायचा का, अशीही चर्चा सुरु झाली आहे
Measles Disease Sample Checking Lab Ahmedabad
Maharashtra Government