नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर पदाची निवडणूक आता गुरुवारी म्हणजेच १६ फेब्रुवारीला होणार आहे. ही निवडणूक तिसऱ्यांदा होणार आहे. दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक १६ फेब्रुवारीला घेण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मान्यता दिली आहे.
हा प्रस्ताव महापालिकेने दिल्ली सरकारकडे पाठवला होता, जो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारला आणि राज निवासला पाठवला. आता याबाबतचा अंतिम निर्णय उपराज्यपालांनी घेतला आहे. आतापर्यंत उपराज्यपाल दिल्ली सरकारने सुचवलेल्या प्रस्तावांचे पालन करत होते. २४ जानेवारी आणि ६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुका घेण्याचा दिल्ली सरकारचा प्रस्ताव होता, जो उपराज्यपालांनी स्वीकारला होता.
तीन वेळा बैठक निष्फळ
दिल्ली महापालिकेची विशेष सभा महापौर निवडणुकीसाठी बोलविण्यात आली. मात्र, त्यात यश आले नाही. नगरसेवकांच्या शपथेपासून ते महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडी एकाच बैठकीत कराव्या लागतात. मात्र, भाजप आणि आप यांच्यात जोरदार संघर्ष झाला आहे. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले आहे. न्यायालयात येत्या १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
महापालिकेतील नाट्यमय घडामोडी अशा
– 4 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या 250 जागांवर सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
– 7 डिसेंबरला निकालात आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले.
– आपला 134, भाजपला 104 आणि काँग्रेसला तीन अपक्षांसह नऊ जागा मिळाल्या.
– 6 जानेवारी 2023 रोजी महापालिकेच्या सभागृहाची बैठक होती, जी पीठासीन अधिकाऱ्याच्या शपथविधीनंतर आप-भाजप नगरसेवकांच्या गदारोळामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
– 24 जानेवारीला पुन्हा बैठक झाली. नगरसेवकांचा शपथविधी झाला, मात्र त्यानंतर गदारोळ झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.
– 26 जानेवारी रोजी ‘आप’ने महापौरपदाची निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
– 30 जानेवारीला महापालिकेने महापौरपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव 10 फेब्रुवारीला दिल्ली सरकारकडे पाठवला. 3, 4 आणि 6 फेब्रुवारी रोजी दिल्ली सरकारने उपराज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला होता.
– 1 फेब्रुवारी रोजी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी महापौर निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती.
– 3 फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली.
– 6 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात तिसरी बैठक झाली, मात्र गदारोळामुळे सभा पुन्हा तहकूब करण्यात आली.
– आम आदमी पक्षाने (आप) पुन्हा 6 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
– 8 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापौरपदाच्या निवडणुकीबाबत दाखल केलेल्या याचिकेवर उपराज्यपाल, दिल्ली सरकार, महापालिका आणि पीठासीन अधिकारी यांच्याकडून उत्तर मागितले.
– 9 फेब्रुवारी रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या प्रस्तावावर 16 फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत उपराज्यपालांकडे पाठविण्यात आला.
– ‘आप’च्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट १३ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे
– 4 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 7 डिसेंबर 2022 रोजी लागला. त्यानंतर नगरसेवकांचा शपथविधी आणि महापौर निवडीसाठी ६ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली. पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी नामनिर्देशित सदस्यांना शपथ घेण्यासाठी बोलावताच आम आदमी पक्षाने (आप) विरोध केला. त्यामुळे गदारोळ होऊन सभा तहकूब करण्यात आली. यानंतर भाजप नगरसेवकांच्या गदारोळामुळे जानेवारी व ६ फेब्रुवारीलाही सभा तहकूब करण्यात आली. या प्रकरणी आम आदमी पक्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे, जिथे 13 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
MCD Delhi Mayor Election New Date Politics