नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रदीर्घ प्रक्रियेनंतर अखेर देशात नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. तसेच आरोग्य सेवांवर काम करावे लागेल. एमबीबीएस अभ्यासक्रमात आता डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी महर्षी चरक यांच्या नावाने शपथ घेणार आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली आदेश जारी केला. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांना तातडीने त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हे आदेश यावर्षी 14 फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठीही लागू होतील. त्याचबरोबर चरक शपथेमागील तर्क असा आहे की ते वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीशी जोडेल.
सध्या देशात एमबीबीएसचे पहिले वर्ष पूर्ण होण्यासाठी सुमारे 14 महिने लागतात, परंतु या वर्षापासून हा कालावधी 12 महिन्यांचा करण्यात आला आहे. म्हणजेच एक वर्षातच त्यांचे पहिले वर्ष पूर्ण होईल. त्याची संपूर्ण माहिती वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांना आदेशासह पाठवण्यात आली आहे. तसेच आयोगाने एमबीबीएससाठी नवीन गुणवत्ता आधारित वैद्यकीय शिक्षण (CBME 2021) प्रणाली लागू केली आहे. सन 2019 मध्येही त्याची अंमलबजावणी झाली. मात्र, नवीन सीबीएमई लागू झाल्याने आता अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल, असा आयोगाचा दावा आहे.
दरम्यान, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत केवळ दोनदाच पूरक परीक्षा देण्याची संधी मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांच्या दरम्यान ही पुरवणी परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षेचा निकाल 10 दिवसांच्या आत जाहीर करावा लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुरवणी परीक्षा होणार नाही. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना विशेष वर्ग आणि वॉर्डमध्ये स्वतंत्र ड्युटी देऊन दुसऱ्या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.