नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-२०२४ दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षाचा फार्माकोलॉजी विषयाची लेखी परीक्षा १९ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, वैद्यकीय विद्याषाखेच्या लेखी परीक्षेदरम्यान २ डिसेंबर २०२४ रोजी दुपार सत्रामध्ये आयोजित द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. (सी.बी.एम.ई.-2019) या अभ्यासक्रमाच्या फार्माकोलॉजी-1 विषयाचा बहुपर्यायी (MCQ) प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्याआधी सुमारे एक तास अगोदर लिक झाल्याचा मेल विद्यापीठास प्राप्त झाला. या अनुषंगाने सखोल चौकशी करणेबाबत मा. कुलगुरु महोदया यांनी आदेशित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या परीक्षामंडळाची बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षामंडळाने निर्देशित केल्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षाचा फार्माकोलॉजी विषयाची फेरपरीक्षा (Re-examination) १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या सत्रात घेण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ स्तरावर चौकशी समिती नेमण्यात येणार असून सदर प्रकरणाची शहानिशा करणेस्तव सायबर सेल अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच स्थानिक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. तरी वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी फार्माकोलॉजी-1 विषयाच्या सुधारित वेळापत्राची नोंद घ्यावी. असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.