नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेस ७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. याबाबत संलग्नित महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. वैद्यकीय विद्याशाखेच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेबाबतची अधिकृत माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, अफवांवर विशअवास ठेऊ नये, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक यांनी सांगितले की, वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रथम वर्ष नवीन अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा व प्रथमवर्ष जुन्या अभ्यासक्रमाची पुरवणी परीक्षा ७ डिसेंबर पासून घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळातर्फे असा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. परीक्षेकरीता आवश्यक परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालयांस वितरीत करण्यात आले आहेत. लेखी परीक्षेनंतर लवकरच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अफवा व खोट्या बातम्या व माहितीपासून सजग रहावे असे त्यांनी सांगितले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वांनी कोविड-१९ करीता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी. परीक्षेसंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संलग्नित महाविद्यालयाचे प्रमुख, प्राचार्य यांनी याबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती द्यावी तसेच परीक्षा संदर्भात सूचना विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि त्यानुसार अनुपालन करावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.