इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – छोट्या पडद्यावरील कौटुंबिक मालिका या घराघरातील महिलांचे विरंगुळ्याचे साधन असते. एखादी वेगळ्या धाटणीची मालिका म्हणूनच अधिक लोकप्रिय ठरते. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही याच पठडीतली मालिका. मालिकेतील यश, नेहा आणि मायरा यांनी सर्वांना आपलंसं केलं आहे. म्हणूनच बहुधा या मालिकेत आलेला नवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीये.
श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांच्या इतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम मालिकेतील परी हिला मिळते आहे. पण, मालिकेत नुकत्याच झालेल्या बदलांमुळे ही परी सतत उदास असते. यामुळे मालिकेचे चाहते वैतागले आहेत. यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं, तो जखमी होतो तर नेहा खोल दरीत पडते. मात्र, त्यांनंतर काही दिवस नेहा या मालिकेतून गायब होती. आता पुन्हा एकदा नेहा या मालिकेत परतणार आहे, पण नेहा म्हणून नव्हे तर अनुष्का म्हणून. प्रार्थनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या सेटवरचा आहे. यात तिचा पूर्ण वेगळा लूक आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करून तिनेच ‘नेहा की अनुष्का’ अशी कॅप्शन त्याला दिली आहे. पण, हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत.
‘आम्हाला अनुष्का नको, नेहाच हवी’, अशा कॉमेंट यावर प्रेक्षक करत आहेत. काहीही करा पण परीला ओळखा, असेही एका चाहत्याने म्हटले आहे. ‘यश, नेहा आणि परी हे तिघे एकत्र नसतील, तर रेशीमगाठ घट्ट कशी होणार’, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. मालिकेतील हा ट्विस्ट बघून मूड ऑफ झाला. मालिका सुरू राहायला पाहिजे, पण त्यात असे बदल नकोत, असाच अनेकांचा सूर आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी बंद केलेली ही मालिका प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू करण्यात आली आहे.