मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाऊंटमध्ये आल्यानंतर त्यांना काढता येत नसल्याच्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह अनेक महिलांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. घाटकोपरच्या आरबीएल बँकेत अशी शेकडो प्रकरणे समोर आल्यानंतर शनिवारी हे सगळे पोलिस ठाण्यात गेले.
बँक परस्पर पैसे कापत असून केव्हायसी नसल्याचे कारण दिले जात असून महिलांच्या हक्काचे पैस मिळत नसल्याची तक्रार महिलांनी पोलिस अधिकारी व सोमय्याकडे केली. यावर आठवडाभराची वेळ सोमय्या यांनी बँकांना दिली आहे. सर्व महिलांना हक्काचे पैसे न मिळाल्यास अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.
३००० रुपये बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोंबरमध्येच मिळत आहे. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे हे पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत ७५०० रुपये जमा होणार
आतापर्यंत या योजनेतून महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यातून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले. आता त्यात ३००० रुपयाची भर पडणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची ही रक्कम ७५०० रुपये होणार आहे. आज सुरुवात झाली असून येत्या १० ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे सर्वांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेत जूलै पासून पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे अगोदरच जमा झाले आहे. आता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे जमा होत आहे.