मुंबई – कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे. या परिषदेसाठी www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.
परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ.शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ.सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ.मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल.