रायपूर (छत्तीसगड) – कोरोना महामारीचा देशात उद्रेक झालेला असताना सरकारने नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे. परंतु काही लोक विनामास्क आणि इतर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. एवढ्यावरच न थांबता काही लोक पोलिसांशी वाद घालत असल्याच्याही घटना घडत आहेत.
छत्तीसगडमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यात राजधानी रायपूरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.त्यात एक युवक स्कूटीवर मित्रांसोबत विनामास्क दिसत आहे. विनामास्क पकडल्यानंतर तो पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. तसेच प्रतिष्ठीतांचा हवाला देत पोलिसांना निलंबित करण्याची धमकी देत असल्याचे दिसत आहे. हा युवक रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा पुतण्या शोएब असल्याचे सांगितले जात आहे. स्कूटीवर फिरताना त्याने मास्क घातलाच नव्हता शिवाय हेल्मेटही परिधान केलेले नव्हते.
प्रकरण वाढत असल्याने शेवटी शोएबला पाचशे रुपयांचा दंड भरावा लागला. कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस शहरांमध्ये चौकाचौकात, गल्लोगल्ली प्रतिंबध लावत आहेत. मात्र अधिकारी, राजकीय नेत्यांची मुले कोरोना नियम तोडून उलट पोलिसांवरच दादागिरी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
बघा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!