इस्लामाबाद (पाकिस्तान) – मौलाना मुफ्ती अझीझुर रहमान याने एका विद्यार्थ्याशी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेत मौलानाला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्याने अत्याचाराची कबुली दिली आहे.
आपला गुन्हा कबूल करत मौलाना म्हणाला की, मी जे केले त्याबद्दल मला लाज वाटते. परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या लोभाने विद्यार्थ्याला माझ्या वासनेचे लक्ष्य बनविले. मोबाईलद्वारे पोलिसांनी मौलानाला शोधून काढले आणि त्याला अटक केली. तसेच मौलानाने त्या विद्यार्थ्याला मृत्यूची धमकीही दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा दहा वर्षापर्यंत तुरूंगवास होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली. मौलानाच्या अटकेपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी ते संपर्कात होते. पोलिसांनी या मौलानाला लाहोरच्या स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. डीएनए व वैद्यकीय नमुने घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण जगभरात चर्चेचे ठरत आहे.